Mpc News Impact : शहरात आजपासून मीटरप्रमाणे रिक्षा सुरु; पोलीस आयुक्तांनी केला मीटर डाऊन

मीटरप्रमाणे जाण्यास नकार दिल्यास वाहतूक विभागाकडे तक्रार करता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार, दि. 21) पासून रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करुन या उपक्रमाची सुरुवात केली. ‘एमपीसी न्यूज’ने ‘स्मार्ट सिटीतल्या रिक्षा मीटरप्रमाणे धावणार कधी ?’ या मथळ्याखाली नुकतेच वृत्त प्रकशित केले होते. त्याला यश आले असून शहरात मीटर प्रमाणे रिक्षा भाडे आकारणे रिक्षा चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे आदी उपस्थित होते.

रिक्षाला मीटर बंधनकारक करण्यात आले आहेत. रिक्षा चालक काही पैशांसाठी मीटर नुसार जाण्यास नकार देतात. अशा वेळी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. त्यानंतर संबंधित रिक्षा चालकावर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सोसायटी फेडरेशन आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमकडून शहरात मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करण्याची मागणी केली होती. मागील तीन दशकांपासून नागरिक ही मागणी करत आहेत. याबाबत माध्यमांनी देखील अनेकदा याबाबत उहापोह केला होता.

वाहतूक विभागाने रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकरण्याच्या विषयावर चर्चा केली. त्यात रिक्षा संघटना देखील मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकारण्याची सकारात्मक असल्याचे दिसले. त्यामुळे यावर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने तात्काळ निर्णय घेत रिक्षाचा मीटर डाऊन केला.

वाहतूक पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. हे पथक शहरात गस्त घालून रिक्षा चालक आणि नागरिकांशी संवाद साधून मीटर बाबत चौकशी करेल. रिक्षाचा मीटर सुरु आहे का, मीटर प्रमाणे भाडे आकारले जात आहे का, याबाबतची चौकशी हे पथक करणार आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारले जात नसेल तर संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात नागरिकांनी शहरातील रिक्षा मीटर प्रमाणे सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. त्यानुसार पोलीस कठोर कारवाई करतील.”

आरटीओ अतुल आदे म्हणाले, “32 व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा ही मीटर टॅक्सी आहे. त्यामुळे ती मीटर प्रमाणे चालायला हवी. मागच्या काळात ही योजना काही करणांमुळे बारगळली. दरम्यान नागरिकांना आता प्रवासी वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या स्पर्धेत रिक्षा चालकांनी टिकून राहायला हवे. त्या दृष्टीने काळानुरुप बदल घडवणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

रिक्षा चालकांनी सेवेचा दर्जा उंचावणे गरजेचे आहे. यापुढील प्रवास मीटर प्रमाणेच होईल. रिक्षा चालकांना आरटीओशी संबंधित ज्या बाबींची आवश्यकता असेल त्यात आरटीओ कडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देखील आदे यांनी यावेळी दिले.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी रिक्षा संघटनांशी चर्चा केली. त्यात त्यांनी सकारात्मकता दाखवली. नागरिकांनी देखील रिक्षा भाडे मीटर प्रमाणे घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे आकारले नाही, तर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. वाहतूक पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जाईल.”

बाबा कांबळे म्हणाले, “शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. गुन्हेगारांवर, बेकायदेशीर धंद्यांवर पोलीस करत असलेली कारवाई समाधानकारक आहे. आम्हाला पोलिसांचा त्यांच्या कामगिरीचा आदर आहे. मीटर टाकून रिक्षा चालविण्याचा आजपासून आम्ही निर्णय घेत आहोत. मेट्रो सिटीत आपण राहत आहोत.

पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. विरळ लोकवस्तीचा भाग आता दाट लोकवस्तीचा झाला आहे. मीटरसाठी नुसता होकार नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे.

अगोदर विरोध केला आणि आता सहमतीची भूमिका का, घेता असे मला म्हटले जाते. पण मीटरला परवानगी दिली म्हणजे रिक्षा चालकाचे प्रश्न सुटलेले नाहीत. शहरात 16 मार्गावरून शेअर रिक्षा चालविल्या जातात. 16 शेअर रिक्षा रस्त्यांच्या व्यतिरिक्त मीटरने जाता येईल.

सध्या शहरात रिक्षा स्टॅण्डची कमतरता आहे. कोरोना काळात रिक्षा बंद असल्याने कर्ज काढून रिक्षा घेतलेल्यांचे हप्ते थकले आहेत. फायनान्स कंपनीचे अधिकारी रिक्षा ओढून नेतात, त्यामुळे याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करुन मदत करण्याची मागणी देखील बाबा कांबळे यांनी यावेळी केली.

मीटरला नकार देणाऱ्या रिक्षा चालकांची इथे करा तक्रार –
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने नागरिकांच्या वाहतूक विषयी समस्या जाणून घेण्यासाठी 9529681078 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. त्यावर आता रिक्षा मीटर बाबतच्या तक्रारी देखील करता येणार आहेत.

आयुक्तांनी केला मीटर रिक्षातून प्रवास, ऑनलाइन पैसेही दिले
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मीटर डाऊन करून रिक्षातून प्रवास केला. त्यानंतर आयुक्तांनी रिक्षाचे भाडे गूगल पे या ऑनलाइन पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून 18 रुपये भाडेही दिले.

मीटर रिक्षाचे असे आहेत दर
मीटर प्रमाणे प्रवास करताना मीटर मध्ये झालेले भाडे दिसते. त्यावर प्रवासी नागरिकांनी लक्ष ठेवावे.
एक किलोमीटर – 18 रुपये
दोन किलोमीटर – 25 रुपये
तीन किलोमीटर – 37.70 रुपये
पाच किलोमीटर – 67 रुपये
10 किलोमीटर – 123 रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.