Mpc News Impact : श्वानाला इमारतीवरून फेकल्याच्या घटनेची दिल्ली दरबारी चर्चा

खासदार मेनका गांधी यांचा थेट सांगवी पोलिसांना फोन

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात एका श्वानाला अज्ञातांनी इमारतीवरून फेकून दिले. त्यात त्या श्वानाचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. या वृत्ताची दिल्ली दरबारी चर्चा झाली असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री आणि विद्यमान खासदार मेनका गांधी यांनी थेट सांगवी पोलिसांशी संपर्क केला. तसेच तपास लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

सुदर्शननगर, पिंपळे गुरव परिसरात एका इमारतीच्या गच्चीवरून भटक्या श्वानाला अज्ञात इसमांनी फेकून दिले. त्यात तो श्वान गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते.

हे वृत्त वाचून आदित्य मिलिंद देशपांडे, रौनाक संग्राम तावडे यांनी फरीनजहाँ विशाल शेख यांच्याशी संपर्क साधला. घटनेला दोन दिवस उलटून देखील पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. या सर्व प्रकाराबाबत देशपांडे आणि तावडे यांनी खासदार मेनका गांधी यांच्याशी इमेल द्वारे संपर्क केला. त्यात खासदार गांधी यांना संपूर्ण हकीकत सांगितली.

अर्ध्या तासातच मेनका गांधी यांचा दिल्लीहून फोन आला. घडलेल्या घटनेची चौकशी केली आणि पोलिसांशी बोलणे करून देण्यास सांगितले. त्यानुसार देशपांडे आणि तावडे यांनी खासदार मेनका गांधी आणि सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांचा संपर्क करून दिला.

खासदार मेनका गांधी यांनी सांगवी पोलिसांना तपास लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी, असेही सांगितले. ‘एमपीसी न्यूज’च्या वृत्ताची दखल स्थानिक पासून केंद्रीय पातळीपर्यंत घेण्यात आली.

सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले म्हणाले, श्वानाला इमारतीवरून फेकल्याच्या घटनेत गुन्हा दाखल आहे. याबाबत खासदार मेनका गांधी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.