MPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा!

एमपीसी न्यूजच्या पाठपुराव्यामुळे मिळाला न्याय!

एमपीसी न्यूज – गृहकर्ज काढून खरेदीखत करून रितसर विकत घेतलेल्या घराचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी दोन वर्षे झगडत असलेल्या एका ‘कोरोना योद्धा’ परिचारिकेला अखेर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व एमपीसी न्यूजने केलेल्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला आहे. दोन वर्षांच्या संघर्षानंतर ही परिचारिका आता स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला गेली आहे. 

निशिगंधा शशांक अमोलिक असे या पीडित परिचारिकेचे नाव असून त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कामाला आहेत. कर्ज काढून त्यांनी काळेवाडी येथे एक घर विकत घेतले, खरेदी खत झाल्यानंतरही त्या घराचा ताबा मिळत नसल्याने अमोलिक हैराण झाल्या होत्या. जानेवारी 2018 पासून घराचा ताबा मिळावा म्हणून त्यांचा लढा चालू होता.

सहा महिन्यांपूर्वी अमोलिक व त्यांचे बंधू प्रशांत भोसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर अमोलिक व भोसले यांनी एमपीसी न्यूजच्या कार्यालयात येऊन संपादक विवेक इनामदार यांच्यासमोर कैफियत मांडली. त्यांच्या विनंतीनुसार एमपीसी न्यूजने अमोलिक यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली.

वारंवार प्रयत्न करूनही दखल घेतली जात नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या अमोलिक यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता. त्याबाबतचे वृत्त एमपीसी न्यूजने दिल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ तसेच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेचा ताबा न देता फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला.

काळेवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. अमोलिक यांना त्यांच्या हक्काच्या घराचा अखेर दोन वर्षांनी ताबा मिळाला.

‘एमपीसी न्यूज’ने मोठा मानसिक आधार दिला – निशीगंधा अमोलिक

खरेदी खतासाठी दिलेले पैसे किंवा घराचा ताबा दोन्हीपैकी काहीच मिळत नसल्याने मी पूर्ण हाताश झाले होते. एमपीसी न्यूज कार्यालयात जाऊन संपादक विवेक इनामदार यांच्यापुढे माझी कैफियत मांडल्यानंतर त्यांनी खचून न जाता लढण्याचा सल्ला देत मोठा मानसिक आधार दिला. त्यामुळे मला मोठा आधार मिळाला. त्यांनी माझ्यावरील अन्यायाला प्रभावीपणे वाचा फोडली. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आणि अखेर मला न्याय मिळाला. त्यासाठी मी एमपीसी न्यूजची सदैव ऋणी राहीन , या शब्दांत निशिगंधा अमोलिक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

प्रदीप नाईक यांनी लढण्याचे बळ दिले – प्रशांत भोसले
महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून माझ्या भगिनी निशिगंधा अमोलिक यांना लढण्याचे बळ दिले. नाईक यांना अन्यायाविषयी असलेली चीड व न्याय मिळवून देण्यासाठी मनात असलेली तळमळ खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. त्यांनी निर्भिडपणे प्रकरण हाताळून आमच्या बहिणीला तिच्या हक्काच्या घराचा ताबा मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम नाईक यांनी यापुढे अखंड चालू ठेवावे, त्यांच्या या कामात मी देखील यथाशक्ती मदत करणार आहे, अशी प्रतिक्रिया अमोलिक यांचे बंधू प्रशांत भोसले यांनी व्यक्त केली.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.