22.2 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

MPC News Impact : पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून मीटरप्रमाणे रिक्षा सुरु; पोलीस आयुक्त करणार ‘मीटर डाऊन’

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात उद्या (शनिवारी) पासून रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. ‘एमपीसी न्यूज’ने ‘स्मार्ट सिटीतल्या रिक्षा मीटर प्रमाणे धावणार कधी ?’ या मथळ्याखाली नुकतेच वृत्त प्रकशित केले होते. तसेच शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी या बाबत मागणी केली होती.  त्याला अखेर यश आले असून शहरात मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणे रिक्षाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

या पुढे रिक्षाला मीटर बंधनकारक करण्यात आले आहेत. रिक्षाचालक काही पैशांसाठी मीटर नुसार जाण्यास नकार देतात. अशा वेळी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. त्यानंतर संबंधित रिक्षा चालकावर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांशी मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकरण्याच्या विषयावर चर्चा केली. त्यात रिक्षा संघटना देखील मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकारण्याची सकारात्मक असल्याचे दिसले. त्यामुळे यावर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने तात्काळ निर्णय घेतला आहे.

वाहतूक पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. हे पथक शहरात गस्त घालून रिक्षा चालक आणि नागरिकांशी संवाद साधून मीटर बाबत चौकशी करेल. रिक्षाचा मीटर सुरु आहे का, मीटर प्रमाणे भाडे आकारले जात आहे का, याबाबतची चौकशी हे पथक करणार आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारले जात नसेल तर संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी रिक्षा संघटनांशी चर्चा केली. त्यात त्यांनी सकारात्मकता दाखवली. नागरिकांनी देखील रिक्षा भाडे मीटर प्रमाणे घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे आकारले नाही तर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. वाहतूक पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जाईल.”

मीटरला नकार देणा-या रिक्षा चालकांची इथे करा तक्रार 

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने नागरिकांच्या वाहतूक विषयी समस्या जाणून घेण्यासाठी 9529681078 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. त्यावर आता मीटर बाबतच्या तक्रारी देखील करता येणार आहेत.

spot_img
Latest news
Related news