MPC News Special : सिंहगड एक्सप्रेसच्या पाच बोगी कमी झाल्याने प्रवाशांची होतेय तारांबळ

सिंहगड एक्सप्रेसमध्ये चालू महिन्यात चौथ्यांदा वाद

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई या दोन महानगरांदरम्यान दररोज (MPC News Special) ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीची असलेली सिंहगड एक्सप्रेस (11010) प्रवाशांमधील वादामुळे चर्चेत येऊ लागली आहे. बसण्याच्या जागेवरून महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये वारंवार वाद होत आहेत. रेल्वेच्या पाच बोगी कमी केल्याने सिंहगड एक्सप्रेसवर प्रवाशांची काहीशी नाराजी दिसू लागली आहे. चालू महिन्यात सिंहगड एक्सप्रेसमध्ये वाद होण्याची सोमवारी (दि. 17) चौथी घटना घडली.

सिंहगड एक्सप्रेस (11010) पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 06.05 वाजता सुटते. पुढे ती खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कल्याण जंक्शन, दादर येथे थांबे घेत सकाळी 09.53 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचते. सिंहगड एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 05.50 वाजता सुटते. ही गाडी रात्री 09.50 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचते.

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी म्हणाले, “पुणे-मुंबई दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिंहगड एक्सप्रेस फायद्याची आहे. पुण्याहून मुंबईला जाणारी सकाळी पहिली रेल्वे सिंहगड रेल्वे आहे. त्यामुळे या गाडीला नेहमी गर्दी असते. कोरोना साथ येण्यापूर्वी या गाडीला 13 जनरल, पाच आरक्षित आणि एक वातानुकूलित असे 19 डबे होते.

कोरोना साथ काळात तीन जनरल डबे कमी करून ही गाडी 16 डब्यांची करण्यात आली. साथ संपल्यानंतर डब्यांची संख्या आणखी कमी करून 14 एवढीच करण्यात आली. सध्या सिंहगड एक्सप्रेसला आठ जनरल, पाच (MPC News Special) आरक्षित आणि एक वातानुकूलित असे 14 डबे आहेत.

पुणे शहर परिसरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद या गाडीला असतो. रेल्वे विभागाने या गाडीचे वेळोवेळी निरीक्षण केले आहे. त्यातही प्रवाशांची संख्या भरपूर असल्याचे निदर्शनास आले. तरी देखील रेल्वेकडून सिंहगड एक्सप्रेस गाडीचे डबे वाढविण्यासाठी चालढकल केली जात असल्याचेही मुलाणी म्हणाले.

रेल्वे प्रवासी दीपाली फुसे म्हणाल्या, “पुणे-मुंबई दरम्यान नियमित प्रवासासाठी सिंहगड एक्सप्रेस सोयीची आहे. मात्र गाडीमध्ये दररोज खूप गर्दी असते. महिलांसाठी आरक्षित बोगी वाढविण्याची गरज आहे. पुरुष प्रवासी महिलांशी उद्धटपणे वागतात. त्यामुळे सतत वाद होत असतात. सिंहगड एक्सप्रेसच्या बोगींची संख्या वाढल्यास प्रवाशांची संख्याही वाढेल.”

Pune Corona Update : संसर्गक्षमता जास्त असलेला कोरोनाचा प्रकार सापडला पुण्यात; काळजी घेण्याचे आवाहन

प्रवाशांना तूर्तास दिलासा नाहीच –

पुणे रेल्वे विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सिंहगड एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या बोगी वाढविण्याबाबत रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने बोगीच्या संख्येत लगेच वाढ होणे शक्य नाही. भविष्यात बोगी वाढविण्याबाबत रेल्वे व्यवस्थापनाकडून निर्णय घेण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तूर्तास तरी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

रेल्वे पोलिसांनी एकाला पकडले –

सोमवारी रेल्वेमध्ये प्रवासी महिलेसोबत वाद घालणाऱ्या एकाला चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले. रेल्वेत वाद (MPC News Special) सुरु असल्याची माहिती मिळताच इकबाल मुलाणी यांनी चिंचवड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी चिंचवड येथे सापळा लावू एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या एका साथीदाराला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कर्जत आणि कल्याण येथे देखील सापळा लावला. मात्र वाद घालणारा दुसरा प्रवासी पोलिसांच्या हाती लागला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.