MPC News Special : मातीतल्या पारंपारिक खेळात रमले बाल गोपाळ

एमपीसी न्यूज – हल्ली मैदानी खेळांना मुले पसंती (MPC News Special) देत नाहीत. विशेषतः शहरातील बहुतांश मुले मैदानाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अशा वेळी त्यांना आपले मातीतले पारंपारिक खेळ माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. आपले पारंपारिक खेळ माहिती व्हावेत. मुलांना त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ओम प्रतिष्ठानचे विद्यांगण हायस्कूल, रावेत येथे पारंपारिक खेळांचे संमेलन भरविण्यात आले आहे. ज्यांनी आजवर मातीत उतरून खेळ अनुभवले नाहीत असे अनेक बाल गोपाळ या ठिकाणी आवडीने विविध खेळ खेळू लागले आहेत.

आधुनिकीकरणात गावं हरवत चालली आहेत. गावांनाही आधुनिकतेचा गंध चढला आहे. हरवलेल्या गावपणात गावातले खेळही हरवू लागले आहेत. सुरपाट्या, विटी दांडू, टायर, गोट्या असे अनेक खेळ मुलांचा शारीरिक विकास करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. तो एक प्रकारचा वारसा आहे.

विविध कारणांमुळे शहरातील मुलांना इच्छा असूनही खेळता येत नाही. मैदानाची फी भरून खेळायला पाठवणे अनेक पालकांना परवडणारे नसते. तिथेही क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस असे ठराविकच खेळ घेतले जातात. याचा परिणाम मुलांच्या स्क्रीन टाईम वाढण्यावर होतो. घरात बसून मुले एकलकोंडी होतात. मग टिव्ही, संगणक, मोबाईलवर तासनतास बसून राहतात. यामुळे त्यांना डोळ्यांसह इतर आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा  

पालकांची व मुलांची ही अडचण लक्षात घेत उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या मातीतले आपले पारंपारिक खेळ मुलांना शिकवण्याची आणि त्यांना मनसोक्त खेळू देण्याची संकल्पना वनिता सावंत यांना आली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही संकल्पना सांगितली. त्यानंतर रावेत येथील ओम प्रतिष्ठानचे विद्यांगण हायस्कूलच्या (MPC News Special) मैदानावर हा उपक्रम 8 ते 12 मे सायंकाळी पाच ते सात या कालावधीत सुरू झाला.

वय वर्ष चार ते 15 वर्ष वयोगटातील 120 मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत. खेळाची ओळख करण्यापासून ते मनसोक्त खेळण्याचा आनंद ही मुले अगदी मोफत घेत आहेत. विविध पारंपारिक खेळ अनुभवता येत असल्याने मुले हरखून जात खेळाचा आनंद घेत आहेत. त्यातच पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.

एवढे खेळ शिकवले जातात –

विटी दांडू, चल्लास आठ, आट्या पाट्या, गोट्या, रुमाल उडवी, लिंगोर्च्या, भोवरा, कांदाफोडी, गिलोरी, चिपळ्या, आप्पा रप्पी, टायर, सागर गोटे, चाकाची चक्री, कोया

आवडेल तो खेळ खेळा – MPC News Special

यामध्ये मुलांचे गट बनविण्यात आले असून एका गटाला एखादा खेळ खेळण्याचा कंटाळा आला तर त्यांना दुसरा खेळ खेळण्याची मुभा आहे. जो खेळ आवडेल तो ते सहज खेळू शकतात. त्यामुळे त्यांन मातीतला रमणीयपणा अनुभवता येतो. त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागते. विशेष म्हणजे यात शिस्तीचे कुठलेही बंधन नाही, असे प्रशिक्षक संदीप सावंत म्हणाले.

दहा प्रशिक्षक देतात प्रशिक्षण –

या खेळांचे प्रशिक्षण दहा प्रशिक्षक देत आहेत. त्यात संदीप बहिरवाडे, वनिता सावंत, संदीप सावंत, पूर्वा सावंत, प्रज्ञा सावंत, शैलेश बडगुजर, अनिल दळवी, प्राची गवांडे, पंकज देव, रसिका गचके यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.