MPC News Special : डिजी लॉकरमधील कागदपत्रे वैध; मूळ कागदपत्रांसाठी आग्रह नको

एमपीसी न्यूज – केंद्र शासनातर्फे डिजी लॉकर (Digi Locker) प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये केंद्र, राज्य शासनातर्फे (MPC News Special) नागरिकांना जारी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची डिजीटल कॉपी उपलब्ध आहे. डिजी लॉकरमधील कागदपत्रांना अधिकृत ठरविण्यात आले आहे. असे असले तरी काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून डिजी लॉकर मधील कागदपत्राऐवजी मूळ कागदपत्रांसाठी आग्रह धरला जातो.

केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजीटल कॉपी डिजी लॉकर मोबाईल अॅपव्दारे उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कागदपत्र उपलब्ध असल्यास त्याचे पुस्तकीस्वरूपात पुन्हा मागणी न करण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. अर्जदार त्यांचा आधार क्रमांक डिजी लॉकर बरोबर सलग्न (link) करुन डिजी लॉकरमध्ये आपले कुठलेही कागदपत्र जतन करुन ठेवू शकतो.

डिजी लॉकर (DigiLocker) अॅपचा वापर करून नागरिक त्यांना जारी करण्यात आलेले वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजीटल कॉपी स्वतःच्या मोबाईल मध्ये जतन करु शकतात. तसेच परिवहन विभागातील वाहतुक विभागतील अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी वाहन चालकास अनुज्ञप्ती व नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केल्यास डिजी लॉकर मधील कागदपत्रे दाखवू शकतात.

नागरिकांकडे जर डिजी लॉकर मधील डिजीटली साक्षांकीत केलेले वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत उपलब्ध असेल व रस्त्यावर वाहतूक करतांना वाहन चालकास अंमलबजावणी अधिका-यांनी किंवा वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी कागदपत्रासाठी थांबविले. तर त्यांनी मुळ वाहन चालक अनुज्ञप्ती / वाहन नोंदणी प्रमाणपत्रा ऐवजी डिजीटल स्वरुपातील वाहन चालक अनुज्ञप्ती / वाहन नोंदणी प्रमाणपत्र दाखविल्यास ते ग्राह्य धरण्यात येते. डिजिटल स्वरूपात कागदपत्रे दाखवणाऱ्या वाहन चालकां विरुध्द केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 130, 170 अन्वये कारवाई करण्यात येवू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत.

लायसन्स ऑनलाईन जप्त करता येते –

विविध प्रकरणांमध्ये वाहन चालकावर अनुज्ञप्ती नोंदणी प्रमाणपत्र (लायसन्स) जप्तीची कारवाई केली जाते. लायसन्स जप्त करावयाचे असल्यास अंमलबजावणी पथक त्याची नोंद ई-चलान माध्यमातून वाहन, सारथी प्रणाली मध्ये घेतात. अशा प्रकरणात फिजीकल (physical) स्वरूपातील कागदपत्रे जप्त करण्याची आवश्यकता राहत नाही. कागदपत्र डिजीटली स्वाक्षरी केली असता ते फिजीकल कॉपी ठेवण्या समान आहे, असे माहिती तंत्रज्ञान कायद्यात म्हटले आहे.

पिंपरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार म्हणाले, “वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना अथवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र याबाबतची मागणी केली असता अनेक वाहन चालक डीजी लॉकर मधील कागदपत्रे दाखवतात. डिजी लॉकर मध्ये जतन केलेली कागदपत्रे वाहतूक विभागाकडून ग्राह्य धरली जात आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.