MPC News Special : नवीन वाहनांची पिंपरी-चिंचवड पोलिसांना प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस (MPC News Special) या दोन्ही पोलीस घटकांना जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून घेण्यात आलेल्या वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वरील दोन्ही घटकांसोबत पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाला देखील जिल्हा नियोजन समितीमधून निधीची घोषणा झाली. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांना वाहने मिळण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील दोन पोलीस घटकांना वाहने मिळाली पण पिंपरी-चिंचवड पोलिसांना वाहने न मिळाल्याने यात दुजाभाव केला जात आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयात भेटी दिल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर वाहनांची अडचण कमी करण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा केली. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावतीकरणासाठी जे लागेल ते द्यायला आपण तयार असल्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी केली.

जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून पिंपरी-चिंचवड पोलिसांना 14 ईर्टिगा कार, 5 स्कॉर्पिओ कार, 1 टेम्पो, 5 दुचाकी अशी एकूण 25 वाहने मिळणार आहेत. त्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संबंधित वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ऑर्डर दिली आहे. ईर्टिगा कारची निर्मिती परराज्यात होते. त्यात कारला वेटिंग असल्याने वाहने (MPC News Special ) मिळण्यासाठी वेळ लागत आहे.

Maharashtra : जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही; जयंत पाटील यांचा खुलासा


पोलीस आयुक्तालयासाठी वाहने खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. वाहनांची ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र वाहने उपलब्ध नसल्याने वाहने मिळण्यासाठी वेळ लागत आहे. पुढील काही दिवसात वाहने मिळतील.
– सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त


पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांना वाहने मिळाली –

जिल्हा नियोजन समितीतून पुणे शहर पोलिसांना दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातून पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात आलेल्या 24 चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीतून पुणे ग्रामीण पोलिसांना दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

त्यातून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी 9 स्कॉर्पिओ व 9 बोलेरो अशी 18 चारचाकी वाहने आणि 6 मोटारसायकल घेण्यात आल्या. त्यांचेही हस्तांतरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील दोन पोलीस घटकांना वाहने मिळाली. मात्र पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना मात्र वाहने अद्याप मिळालेली नाहीत. शहर पोलिसांना आणखी काही दिवस वाहनांसाठी वाटच पाहावी लागणार आहे.

तोकड्या संसाधनांवर आयुक्तालयाची भिस्त –

पोलीस मुख्यालयासाठी जागेचा शोध अजूनही सुरुच आहे. जागा शोधून तिथे इमारत बांधणे, पोलिसांसाठी मैदान बनवणे, शस्त्रागार बांधणे याची आवश्यकता आहे. श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) अशा पथकांची गरज आहे. सायबर सेल सुरु झाले असले तरी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. सायबर पोलीस स्टेशन पाच वर्षांनंतरही प्रलंबित आहे.

पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखाना होणे गरजेचे आहे. पोलिसांसाठी वाहने, वाहन चालक, पेट्रोल पंप, पोलीस अधिकारी, कर्मचारी अशी आवश्यक बाबींची भलीमोठी यादी आहे. अतिशय तोकड्या संसाधनांवर आयुक्तालयाचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात वाहने मिळाली तरी इतर संसाधनांसाठी शहर पोलिसांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.