MPC News Special : अवकाळीच्या अंदाजातच सरला एप्रिल महिना

एमपीसी न्यूज – पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे… दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल… विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल… वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल… अशा प्रकारचे अंदाज हवामान विभागाकडून एप्रिल महिन्यात वर्तवण्यात आले. (MPC News Special)  त्यातील बहुतांश अंदाज खरे ठरले. त्यामुळे सबंध एप्रिल महिना हवामान विभागाच्या अंदाजातच सरला आहे. एप्रिल 2023 मध्ये दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. मात्र रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा वाढले असल्याची हवामान विभागाने नोंद केली आहे.

Nigdi : स्वतः श्रीकृष्ण होऊन मनातील अर्जुनाचा संभ्रम दूर करा – रवींद्र मुळे

पुणे शहर आणि परिसरासाठी उन्हाळी हंगामातील सामान्य कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस मानले जाते. सातत्याने निर्माण होणारे ढगाळ वातावरण, वारा आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान सामान्य पेक्षा कमी नोंदवले गेले. मागील तीन वर्षानंतर अशी स्थिती पुणेकरांना अनुभवता आली आहे. एप्रिलच्या 30 दिवसांपैकी 20 दिवस तापमान सातत्याने कमी झाले.

 

रात्रीचे तापमान वाढले

एप्रिल महिन्यात दिवसाचे तापमान कमी नोंदवले गेले. मात्र रात्रीचे तापमान सामान्य पातळीपेक्षा वाढले आहे. ढगांची घनता आणि शहरी उष्णतेचा प्रभाव हे रात्रीचे तापमान वाढण्याचे मुख्य कारण ठरले.(MPC News Special) एक एप्रिल रोजी 15.2 अंश सेल्सिअस महिन्यातील सर्वात कमी तर 26 एप्रिल रोजी 22.2 अंश सेल्सिअस महिन्यातील सर्वाधिक अशी रात्रीच्या तापमानाची नोंद होती. एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यात 24.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस मागील दहा वर्षातील सर्वाधिक ठरला.

 

मे महिन्यातही काही दिवस पावसाचे

मे महिन्यात देखील पुणे शहर आणि परिसरातील तापमान सामान्य ते सामान्य पेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान बदलांच्या स्थितीचे हवामान विभागाकडून सातत्याने निरीक्षण केले जात आहे. पुढील काही दिवस अंशतः अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पाऊस झाल्यानंतर हवामान पूर्ववत होईल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

 

वातावरणाच्या वक्रदृष्टीने जनजीवन विस्कळीत

पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड भागात एप्रिल महिन्यात हवामानाची वक्रदृष्टी राहिली. यादरम्यान झाडपडी, खांब कोसळणे तसेच बॅनर कोसळण्याच्या घटना घडल्या. यात काहीजणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर झाडे वाहनांवरती कोसळून वाहनांचे नुकसान झाले. एकंदरीत भर उन्हाळ्यात वातावरणाच्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.

 

अंदाज ए हवामान विभाग

वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी पुणे हवामान विभाग सुसज्ज आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतील वातावरणीय बदलांचा अचूक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात देखील हवामान विभागाने सातत्याने आगामी दिवसातील हवामानाचे अंदाज वर्तवले.(MPC News Special) त्यानुसार वादळी वारे, गारपीट, मुसळधार पाऊस, तसेच सोसाट्याचा वारा आला. त्यामुळे एकेकाळी हवामान विभागाच्या अंदाजावरती संशय व्यक्त करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर आता हवामान विभागाच्या अंदाजावर पूर्णतः विसंबून राहू लागले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.