MPC News Vigil : ‘ऑनलाईन प्रेमा’ तुझा रंग कसा?

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – ऑनलाइन माध्यमातून प्रेमाचा झांगडगुत्ता  अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रेमासारख्या पवित्र भावनेला ‘झांगडगुत्ता’ असा जाणीवपूर्वक शब्द वापरला आहे. कारण, ऑनलाईन माध्यमातून जुळणारी प्रेम प्रकरणे ठराविक उद्देशासाठी जुळवली जातात. त्यामुळे प्रेमाच्या भावनेखाली जुळवली जाणारी नाती स्वतःच्या अपेक्षा, हेतू पूर्ण झाल्यानंतर अचानक तोडली जातात. अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक, लूटमार आणि बलात्कारासारखे गंभीर प्रकारही झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन डेटिंग अॅपच्या माध्यमातून प्रेमात पडताना जरा अधिकच सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण ऑनलाइन प्रेमाचा रंग काही औरच आहे.

टिंडर, बंबल, हॅपन, ओके क्युपिड, मीट माईंडफुल आणि अन्य अनेक डेटिंग अॅप सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे अॅप कितपत सुरक्षित आहेत, याचा अंदाज लावणं कठीण आहे. पण या माध्यमातून अनेकजण सध्या आपल्या तथाकथित प्रेमाची भूक भागवत आहेत. ही भूक भावनिक, शारीरिक अशा दोन्ही प्रकारची आहे. जिथे शारीरिक हव्यास असतो तिथं निखळ प्रेम कितपत असतं हे सांगणही कठीण आहे. डेटिंग अॅपमधून उथळ प्रेमाचे केवळ झरे वाहतात हे मात्र नक्की.

डेटिंग अॅपमध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावे लागते. काहीजण खोटी माहिती भरून बनावट खाते उघडतात. डेटिंग अॅप युजरला त्याच्या आवडीनिवडी, अपेक्षा, सवयी, वय असे सर्व प्रश्न विचारते. त्यातून तुम्हाला डेटिंग अॅपवर मैत्री हवी आहे की लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म अथवा कॅज्युअल रिलेशनशिप हवी आहे, याचीही माहिती घेतली जाते. नकळत तुम्हाला वैयक्तिक माहिती देखील विचारली जाते. ही माहिती भरणं ऑप्शनल असतानाही काहीजण भावनेच्या भरात सगळी माहिती भरून टाकतात. तुम्ही ज्या प्रकारची माहिती भरली आहे, त्या माहितीला साजेशी अन्य लोकांची माहिती संबंधित अॅपमध्ये तुम्हाला दिसायला लागते.

माहिती भरणे म्हणजे चूक आहे असे नाही. पण डेटिंग अॅप तुमची माहिती सुरक्षितच ठेवेल हे कशावरून. कारण, मीट माईंडफुल या डेटिंग अॅपमधील 22 लाख लोकांचा डेटा हॅक झाला असल्याचे वृत्त नुकतेच आले आहे. यातून डेटिंग साईट सुरक्षित नाहीत, असंच सिद्ध होतं. दुसरी बाब अशी की काहीजण फेक अकाउंट तयार करून समोरच्या व्यक्तीच्या अन्य सोशल साईटची माहिती घेतात. तिथून त्यांचे फोटो घेऊन त्याचे मॉर्फिंग करून ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार करतात. यातून खंडणी उकळणे, शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडणे असे प्रकार होतात.

वाकड परिसरात डेटिंग अॅप वरून मैत्री होऊन त्यातून गुन्हेगारी कृत्ये झाल्याच्या दोन घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. एका तरुणाची एका एअर होस्टेस असलेल्या तरुणीसोबत टिंडर या डेटिंग अॅपवरून ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमाची भावना निर्माण झाली. काही दिवसानंतर वाकड येथे राहणाऱ्या तरुणाने एअर होस्टेस असलेल्या तरुणीला वाकड परिसरात बोलावून घेतले. तिथल्याच एका हॉटेलवर नेऊन तिला दारू पाजली. त्यानंतर तिला आपल्या घरी आणून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विरोध केला असता त्या तरुणाने तिला मारहाण करून जखमी केले.

आणखी एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यात चेन्नई येथील एका तरुणाचे वाकड पुणे परिसरातील एका तरुणीसोबत बंबल या डेटिंग अॅपवरून सूत जुळले. पुढे एकमेकांसोबत बोलणे होऊन तिने तरुणाला पुण्यात बोलावून घेतले. वाकड मधील एका आलिशान हॉटेलमध्ये तरुणाने खोली बुक केली. तिथे तरुणीने तरुणाच्या शितपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याला पाजले. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर तरुणीने त्याची सोनसाखळी, अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज घेऊन हॉटेल मधून पळ काढला.

वरील दोन्ही प्रकरणांमध्ये प्रेम, मैत्री यापैकी कशाचा साधा मागमूस सुद्धा नाही. एका प्रकरणात शारीरिक उपभोगाची भूक तर दुसऱ्या प्रकरणात विश्वासघात करून लुबाडण्याची वृत्ती दिसून येते. केवळ वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यासाठी प्रोफाइल तयार करताना भुरळ पाडणारी माहिती द्यायची; असाच उद्योग सध्या सुरू आहे.

डेटिंग अॅपच्या संस्कृतीत प्रेमाची संकल्पना बदलत आहे. त्याग, समर्पण म्हणजे प्रेम ही पारंपारिक व्याख्या आता आऊटडेटेड झाली आहे. डेटिंग अॅपवर फेक अकाउंट तयार करून तुमची वयक्तिक माहिती घेतली जाऊ शकते. सोशल मीडियावरील ओळख घेऊन तिथे तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. आर्थिक फसवणूक, बलात्कार, लूटमार असेही प्रकार होऊ शकतात.

काळजी घेणे, खात्री करणे, कोणतीही माहिती देताना माहिती आणि आपण सुरक्षित आहोत ना याची पडताळणी करणे असे काही उपाय यावर करता येतील. डेटिंग अॅपमध्ये केवळ मैत्रीचा देखील ऑप्शन आहे. तुम्हाला निखळ मौत्री हवी असेल, तुमच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चांगल्या मित्राची गरज असेल तर या अॅपद्वारे बनलेले मित्र तुमची चांगली सोबत होऊ शकतात. यातून चांगले लाईफ पार्टनर देखील मिळू शकतील. पण तुम्ही किती गांभीर्याने, काळजीपूर्वक निवड करता त्यावर अवलंबून आहे. कारण ऑनलाईन प्रेमाचा रंगच वेगळा आहे. हा घातक रंग बघण्यासाठी तुमची एक चूक कारणीभूत ठरू शकते.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश याबाबत म्हणतात की, डेटिंग अॅपद्वारे चांगल्या ओळखी निर्माण करा. चांगला मित्र परिवार तयार करा. वन नाईट स्टॅण्डच्या उद्देशाने डेटिंग अॅपकडे जाऊ नका. युवक युवती घरापासून दूर राहून शिक्षण, नोकरी करतात. तिथे मिळालेली मोकळीक काहीजण अशा पद्धतीने व्यर्थ घालवतात. अनेक वेळेला पीडित तक्रारही देऊ शकत नाहीत. त्यामुळे काळजी घेणे, आयुष्याबद्दल गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.