Pimpri : स्वयंसेवी संस्थांना ‘एमपीसी न्यूज’चे आवाहन

एमपीसी न्यूज – देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला. यामुळे शहरात नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी किंवा इतर कारणासाठी आलेले परगावचे लोक व विद्यार्थी आहे त्याठिकाणी अडकून पडले. सर्वच ठिकाणे बंद ठेवण्यात आल्यामुळे खानावळ, मेस, रेस्टॉरंट, हॉटेल हे सुद्धा बंद ठेवण्यात आली. यामुळे बॅचलर आणि जेवणाची सुविधा नसलेल्या लोकांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल व्हायला लागले. या काळात त्यांना मायेचा घास भरवणाऱ्या आणि गरीबांना रेशन इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात देऊ केला. रेशन, जेवण यामाध्यमातून मदत पोहोचू लागली पण कोरोना पासून बचावासाठी आवश्यक नियमांचे पालन काही ठिकाणी होताना दिसत नाही, हा चिंतेचा विषय आहे.

कोरोना पासून बचाव करण्यासाठी सरकारच्या वतीने व आरोग्य विभागाच्या वतीने काही  सवयींचा अवलंब करण्यासाठी सांगण्यात आले आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, खोकताना किंवा शिंकताना नाकाजवळ, तोंडाजवळ टिशू किंवा रुमालाचा धरणे, जेवण बनवत असताना हात निर्जंतुक करावे, तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरणे गरजेचे आहे, तसेच वस्तूंचे किंवा जेवणाचे वितरण करत असताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे तसेच अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना किंवा त्याला मदत देऊ करताना सुरक्षित अंतर ठेवून योग्य खबरदारी घेतली जाणे अपेक्षित आहे. या सवयीमुळे आपण कोरोना पासून बचाव करू शकतो.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठी व गरीब लोकांसाठी वेगवेगळ्या स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला. मदत  वितरित करत असताना स्वयंसेवी संस्था अजूनही योग्य काळजी घेताना दिसत नाहीत आणि हे धोक्याचे आहे. मदत वितरित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी संचार करावा लागतो तसेच वेगवेगळ्या लोकांशी दररोज संपर्क येत असतो त्यामुळे अशा लोकांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच जेवण बनवत असताना व जेवणाची पॅकिंग करत असताना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अवलंब करणे, मास्कचा वापर करणे आणि स्वच्छतेची योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण नकळतपणे झालेल्या चुकीची मोठी परतफेड करावी लागू शकते.

स्वयंसेवी संस्थांनी अशा आणीबाणीच्या परिस्थितीत घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे ते करत असलेल्या कामाची खरच तुलना शक्य नाही. पण या संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीत आपण स्वतःच त्या विषाणूचे वाहक असू शकतो. त्यामुळे नकळतपणे झालेली चूक महागात पडू शकते. तुम्ही करत असलेल्या कामाला ‘एमपीसी न्यूज’ सलाम करते आणि आवाहन करते की या नाजूक परिस्थितीत आपण सर्वांनीच योग्य खबरदारी घेऊन सर्वांचे स्वास्थ्य सुरक्षित राहील याची काळजी घेऊया!

‘एमपीसी न्यूज’ने देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमची पुणे, पिंपरी व चिंचवड येथील तिन्ही कार्यालये बंद ठेवली आहेत. टीम एमपीसी न्यूजचे सदस्य वर्क फ्रॉम होम करीत आहेत. बातमीसाठी बाहेर जावेच लागले तर मास्कचा वापर केला जात असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. हे आम्ही केले आहे, आपणही हे सहज करू शकता! कोरोनाची साखळी या सोप्या सोप्या गोष्टींमुळेच तुटणार आहे. चला सर्वजण मिळून कोरोनाला हरवूयात!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.