MPC News Exclusive: ‘कोविड’ सेंटरमधील लाखोंचे साहित्य उघड्यावर; तोडफोड, नासधूस, चोरीकडे महापालिकेचे दुर्लक्ष!   

एमपीसी न्यूज (गणेश यादव, प्रमोद यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांसाठी घरकुलमध्ये लाखो रुपये खर्च करुन ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले होते. रुग्णसंख्या आटोक्यात येताच सेंटर बंद केले खरे, पण लाखो रुपयांचे साहित्य तिथेच वा-यावर सोडले. महापालिकेने तिथे सुरक्षारक्षक सुद्धा नेमला नाही. परिणामी, लाखो रुपयांच्या साहित्याची तोडफोड, चोरी, नासधूस होत असल्याचा संतापजनक प्रकार ‘एमपीसी न्यूज’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेचा दावा किती पोकळ आहे हे यावरून स्पष्ट होते.

कोविड सेंटरसाठी पालिकेने केली होती महागड्या वैद्यकीय उपकरणांची खरेदी!

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेने कोरोना कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात कोरोनासाठी 100 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेले नागरिक, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले नागरिक आणि विलगीकरणासाठी शहराच्या विविध भागातील 11 ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) उभारले होते.

घरकुल येथील इमारतीमध्येही एक सेंटर सुरु केले. पालिकेने महागडी वैद्यकीय उपकरणे, रुग्णाला लागणारे साहित्य खरेदी केले. सर्व साहित्यासह एका खासगी संस्थेला हे सेंटर संचलनासाठी दिले. त्यासाठी संस्थेला कोट्यवधी रुपयांची बिले सुद्धा देण्यात आली.

कोरोनाची रुग्णसंख्या घटताच महापालिकेचे सेंटरकडे दुर्लक्ष!

जून 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली. त्यामुळे महापालिकेने सीसीसी सेंटर बंद करताच संस्थेनेही काम बंद केले. पण, गरम पाण्यासाठी इलेक्ट्रीक गिझर, अग्निप्रतिबंधक उपकरणे,  ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्या, टेबल, फॅन, बेड, गाद्या, चादर, खुर्च्या, दिव्यांगाचे साहित्य, ताट, ग्लास, सॅनिटायझर, रुमाल, थर्मास असे लाखो रुपयांचे साहित्य वा-यावर सोडले.

हे साहित्य अस्ताव्यस्त पडले असून त्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटताच महापालिकेचे या सेंटरकडे दुर्लक्ष झाले. लाखो रुपयांचे साहित्य असतानाही तिथे सुरक्षारक्षक नेमला नाही. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले नाहीत, कोणत्याही खोलीला साधे ‘लॉक’ लावण्याची तसदी देखील महापालिका प्रशासनाने घेतली नाही.

सुरक्षारक्षकांअभावी कोविड सेंटर बनले मद्यपींचा अड्डा!

हॅण्डग्लॉज, हातमोजे, गाद्या, सलाईन, पाण्याच्या बाटल्या तिथेच जाळलेल्या स्वरूपात दिसत आहेत. इमारतीमधील इलेक्ट्रीकल फिटींग, प्लंबिंगचे साहित्य तोडले गेले आहे. तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सीसीसी सेंटर मद्यपी, जुगार अड्डा बनला आहे.  सेंटरचे संचलन करणारी संस्था कोट्यवधी रुपये कमवून गेली. महापालिकेनेही गरज संपली की लाखोंच्या साहित्याकडे दुर्लक्ष केले अशी स्थिती पाहायला मिळाली. पण, करदात्यांच्या पैशांतून खरेदी केलेल्या साहित्याच्या होत असलेल्या या प्रचंड नुकसानीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचा पालिकेचा दावा पोकळ?

ओमायक्रॉनच्या संकटासह कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. पण, घरकुलमधील सीसीसी सेंटरचे चित्र पाहिल्यानंतर महापालिकेचा दावा किती पोकळ आहे हे सांगून जाते.

तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास सीसीसी सेंटरची गरज भासणार आहे. त्यासाठी महापालिका पुन्हा घरकुलमधील सीसीसी सेंटरसाठी साहित्य आणि सुविधा निर्माण करण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत विचारणा केली असता अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”घरकुलमधील कोविड केअर सेंटरमधील साहित्याची पाहणी करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील”.

सीसीसी कोविड केअर सेंटर आणि त्याची झालेली नासधूस –

सीसीसी कोविड केअर सेंटर, घरकुल – कोविड रुग्णांसाठी महापालिकेकडून उचलेलं पाऊल

कोविड सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर हॅण्डग्लॉज, हातमोजे, गाद्या, सलाईन, पाण्याच्या बाटल्या तिथेच जाळलेल्या स्वरूपात दिसून येत आहेत.

दारूच्या बाटल्या देखील तिथेच पडलेल्या… दारुड्यांनी कोविड सेंटरला बनवला अड्डा!

रुग्णांसाठी पांघरूण म्हणून मागवलेल्या सोलापूर चादरी पडल्या धूळखात… 

टेबलांची दुर्दशाही तशीच… अगदी नव्या टेबलांना धुळीचे कव्हर!

याला कचरा म्हणावं की आरोग्य सुविधा?

बेड, ऑक्सिजन सिलेंडर सारे काही उघड्यावरच!

या अस्थाव्यस्त आरोग्य साहित्याचे भविष्य काय?

‘कोणी आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या’ म्हणून या विखूरलेल्या गिझरचा टाहो असेल का?

अजून एक दुर्लक्ष कोपरा…!

असे हे दुर्लक्षित चित्र संपुर्ण सीसीसी केविड केअर सेंटरमध्ये पाहायला मिळाले. यावर महापालिका काय पाऊल उचलणार हे पाहणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे. 

आरोग्य व्यवस्थेची ही विदीर्ण अवस्था –  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.