MPSC Postponed : मराठा आंदोलनाचा धसका; एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. दोन लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.

राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. अकरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा होती. मात्र, करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला.  त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी, असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे, पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं.

तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो, असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली होती. त्यामुळे  अखेर राज्य सरकारने अकरा ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.