Pimpri News : महापालिकेच्या चुकीच्या कामाची शिक्षा महावितरणला का?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराच्या बहुतांश भागामध्ये रस्त्याची कामे काढली आहेत. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ‘जेसीबी’ व ‘पोकलेन’च्या सहायाने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या खोदकामात महावितरणच्या विद्युत वाहिन्या उघड्या पडल्या आहेत.

अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या मोठ्या प्रमाणावर तुटलेल्या आहेत. त्या दुरूस्त करण्याची जबाबदारी महापालिका घेत नाही. अशावेळी नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे संबंधित भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रशासनाला तात्पुरती दुरूस्ती करावी लागते. त्याचा खर्च महावितरणलाच करावा लागतो. पालिकेच्या चुकीच्या कामाची शिक्षा महावितरणला नाहक भोगावी लागते. पालिकेने विद्युत वाहिन्या स्वतः दुरूस्त कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

याबाबत सौंदणकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या तीन-चार वर्षांपासून 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात खोदकाम केले जात आहे. अद्यापही हे काम सुरूच आहे. खोदकाम करताना विद्युत वाहिन्या उघड्या पडल्या आहेत.

पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी जमा होऊन अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने वायर बर्स्ट झाल्या आहेत. वायर तुटल्यामुळे पुढील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले. महावितरणकडे नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार सुरू झाला. आज देखील अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यात विद्युत विभागाची कसलीही चूक नसताना समाजात महावितरणची बदनामी होऊ लागली आहे.

24 तास पाणी पुरवठा योजना असेल अथवा रस्ते काँक्रिटीकरण, ही कामे महानगरपालिकेची आहेत. या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात.

या कामात उचकटलेल्या विद्युत वाहिन्या पुन्हा भूमिगत करण्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत वाहिनीस काही अढथळे आल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला चांगला रस्ता खोदावा लागेल. त्यात नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशाचा विनाकारण अपव्यय होतो. यासाठी यापुढे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यापूर्वी विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतराचा विचार प्राधान्याने करावा. खोदकामात उघड्या पडलेल्या विद्युत वाहिन्या तुटल्यास किंवा भूमिगत करण्यासाठीचा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी सौंदणकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.