MSEDCL News : पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 4.57 कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

एमपीसी न्यूज: वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून चोरून विजेचा वापर करणा-यांना महावितरणाने दणका दिला आहे. महावितरणाने वीजचोरीविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यात झालेल्या नियमित व विशेष मोहीमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा वर्गवारीतील 1876 ठिकाणी तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांच्या वीजचो-या उघडकीस आणल्या आहेत.

सर्व वर्गवारींमध्ये पाहिजे तेवढ्या वीजभाराची अधिकृत वीजजोडणी उपलब्ध असताना वीजचोरी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. याच्याबरोबरच प्रादेशिक विभागामध्येही धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.

महावितरणाने आत्तापर्यंत झालेल्या 1878 ठिकाणच्या कारवाईत तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांच्या वीजचो-या उघडकीस आणल्या आहेत. 566 प्रकरणांमध्ये 99 लाख रुपयांची वसुलीदेखील करण्यात आलेली आहे.

या मोहिमेला अजून वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे स्व:च्या या मोहीमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणाच्या पथकांना मार्गदर्शन करत आहेत आणि विविध प्रकारांची माहिती घेत आहेत.

उघडकीस आलेल्या सर्व प्रकरणांत भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. यात ज्यांनी दंडाच्या रकमेसह चोरी केलेल्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात भोसरी, पिंपरी, कोथरूड, पर्वती, केडगाव, नगररोड, पद्मावती, रास्तापेठ या भागांत वीजचोरीच्या धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यांत 1096 ठिकाणी 3 कोटी 99 लाख रुपयांच्या वीजचो-या उघडकीस आल्या असून त्यातील 194 प्रकरणांमध्ये 59 लाख रुपयांचा दंड व वीजबिलांची वसुली करण्यात आली आहे.

मागील चार दिवसांत साधारण 240 अभियंते व कर्मचा-यांनी विविध पथकांद्वारे वाघोली परिसर, ताथवडे हायवे, पिंपळे निलख, हिंजवडी, भेकाईनगर, मांजरी, उंद्री पिसोळी, वारजे, कात्रज या भागांत वीजचोरीचीविरोधातील मोहीम राबवण्यात आली.

यात सुमारे 53 लाख रुपयांच्या वीजचो-या सापडल्या आहेत. यांत पिंपरी विभागाने 54 तर पद्मावती विभागाने 51 वीजचो-या उघडकीस आणल्या आहेत.

या मोहीमेमध्ये अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, प्रकाशक राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता, अभियंते व कर्मचारी सहभागी झाले होते.

यांवेळी विद्युत अपघाताचा धोका असलेल्या विजेची चोरी करण्यापेक्षा अधिकृत वीजजोडणी घेऊन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.