Chakan News : महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन कंपन्यांसोबत मिळून शासनाला घातला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज – चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता या दोघांनी दोन कंपन्यांसोबत मिळून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महावितरणचे दोन अधिकारी आणि दोन कंपन्यांच्या विरोधात फसवणूक, अपहार आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे येथे घडला.

चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राहुल अशोक डेरे, सहाय्यक अभियंता शरद विश्वासराव जगदाळे, सिक्युअर एजन्सी कंपनीचे पदाधिकारी, तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीचे मालक व प्रतिनिधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजगुरुनगर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिहर जगतसिंग गोठवाड (वय 52) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि शरद हे महावितरण कंपनीचे पदाधिकारी आहेत. त्यांनी कंपनीच्या वतीने ग्राहकांना मीटर बसविण्याचे काम दिलेल्या सिक्युअर एजन्सीचे पदाधिकारी यांच्यासोबत व निघोज गावातील तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीचे मालक व पदाधिकारी यांच्या सोबत संगणमत करून तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीला पुरवलेल्या दोन लाख 19 हजार 524 विद्युत युनिटचे 18 लाख 27 हजार 320 रुपयांचे बिल आकारले नाही.

बिल न आकारता महावितरण आणि शासनाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडविला. तसेच सिक्युअर एजन्सी या कंपनीने महावितरणच्या ग्राहकांना अदा करण्यासाठी दिलेल्या 1 हजार 405 मीटर पैकी 22 नवीन मीटर आणि एका ग्राहकाचा मीटर असे तीन लाख 45 हजार 400 रुपये किमतीचे 23 मीटरची माहिती महावितरण कंपनीला दिली नाही. कंपनीने विश्वासाने सोपविलेल्या मीटरचा आरोपींनी अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.