Bhosari : औद्योगिक वीजचोरी प्रकरणी 47 ठिकाणी महावितरणची कारवाई

एमपीसी न्यूज – भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे एकाच परिसरात तब्बल 47 पत्र्यांच्या शेडमधून सुरु असलेली वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने बुधवारी (दि. 25) धडक कारवाई करून उघडकीस आणली. याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे.

भोसरीमध्ये इंद्रायणी परिसरात सुमारे 80 पत्र्यांचे शेड उभारलेले आहेत. या शेडमध्ये औद्योगिक कारणांसाठी वीजवापर केला जात आहे. मात्र काही शेडमध्ये अनधिकृत वीजवापर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने धडक कारवाईची योजना आखली. या कारवाईसाठी एकूण 19 पथके तयार करण्यात आली.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 75 अभियंते व कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले. पोलीस बंदोबस्तात बुधवारी सकाळी 11 वाजता इंद्रायणीनगरमधील पत्र्यांच्या शेडमधील वीजजोडण्यांची या पथकांद्वारे तपासणी सुरु करण्यात आली. यात एकूण 47 पत्र्यांच्या शेडमध्ये थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले.

दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. वीजचोरी उघडकीस आल्यानंतर भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.