Pune News : महावितरणचे ‘एक दिवस एक गाव’ अभियान, रविवारपर्यंत 59 गावांत आयोजन

एमपीसी न्यूज – थेट गावात जाऊन महावितरणची सर्व सेवा उपलब्ध करण्यासोबतच वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या जनजागृतीसाठी पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत ‘एक दिवस एक गाव’ अभियानाला सुरवात झाली आहे. कनेसर, पाईट, कडूस (ता. खेड) व उरवडे, ओसाड (ता. मुळशी) या गावांमध्ये अभियान घेण्यात आले. येत्या रविवारपर्यंत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील 59 गावांमध्ये या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्ये गावातच महावितरणची सर्व वीजसेवा उपलब्ध व्हावी तसेच तक्रारींचे निवारण व विविध योजनांच्या फायदे मिळवून देण्यासाठी ‘एक दिवस एक गाव’ राज्यभरात राबविण्याचा निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी हे अभियान राबविण्याचे एका परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.

यामध्ये एकाच दिवशी एका गावात जाऊन घरगुती, कृषिपंपासह इतर नवीन वीजजोडण्या, वीजबिलांची दुरुस्ती, विविध तक्रारींचे निवारण, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. सोबतच वीजग्राहकांना ऑनलाइन ग्राहकसेवा, वीजबचत व सुरक्षा तसेच कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 ची सविस्तर माहिती दिली जात आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यांतील सर्व गावांमध्ये या अभियानाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या रविवारपर्यंत या तालुक्यांमधील 59 गावांमध्ये हे अभियान होणार आहे. आयोजनाबाबत संबंधीत गावांतील नागरिकांना पूर्वकल्पना देण्यात येत असून आवश्यक सर्व साधनसामग्रीसह संबंधित अभियंता व जनमित्रांचे पथक गावात दिवसभर राहणार आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी ग्रामीण मंडलमधील विविध उपविभाग व शाखा कार्यालयांना नुकत्याच भेटी देऊन ‘एक दिवस एक गाव’ अभियानाच्या आयोजनाबाबत सूचना केली आहे. त्याप्रमाणे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे.

कडूस, कनेरसर व पाईट (ता. खेड) तसेच उरवडे व ओसाडे (ता. मुळशी) या गावांमध्ये आयोजित अभियानात घरगुती, वाणिज्यिक व कृषी वर्गवारीसाठी नवीन वीजजोडण्यांची 127 अर्ज स्वीकारण्यात आले तर 82 अर्जांसाठी कोटेशन देण्यात आले. याआधी अर्ज केलेल्या 53 ग्राहकांकडे नवीन मीटर बसवून वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

तसेच वीजबिलांची दुरुस्ती, सदोष मीटर बदलणे, मीटर रिडींग नियमित करणे आदीं कामे करण्यात आली. सोबतच उपस्थित ग्रामस्थांना कृषिपंप वीजजोडणी धोरणातील फायदे समजून सांगण्यात आले व गाव परिसरातील वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली.

या अभियानाला पाचही गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्व ग्राहकसेवा व तक्रारींचे निवारण जागेवरच होत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानामध्ये कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे (राजगुरुनगर) व माणिक राठोड (मुळशी), जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे (राजगुरुनगर) व फुलचंद फड (मुळशी), सहायक अभियंता राहुल फालके, ज्ञानेश्वर बोरचाटे, स्वाती पाटील यांच्यासह जनमित्रांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.