MSRTC Updates : लाल परीचा प्रवास महागणार?

एमपीसी न्यूज – पेट्रोल -डिझेल रोजच नवा उच्चांक गाठत आहेत, तर दुसरीकडे महागाईमुळे खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. अशा अनेक कारणांमुळे एसटी महामंडळ देखील लाल परीच्या तिकीट दरांत वाढ करण्याची शक्यता आहे आणि याचाच फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे.

कोरोना काळात लाॅकडाॅऊनमुळे एसटीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यामध्ये साधारण 12 हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. तोटा पत्करून सुद्धा पेट्रोल -डिझेलचे वाढते दर, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भाग यांचे वाढलेले दर अशा अनेक आर्थिक कोंडीला महामंडळ सामोरे जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच तिकीटदरांत तब्बल 17 टक्क्यांनी वाढ होणार आहे. हा प्रस्ताव खरंतर 4 महिन्यांपूर्वी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता मात्र तो काही कारणास्तव मंजूर झाला नाही. आता मात्र हा प्रस्ताव नव्याने प्राधिकरणाकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे. त्याआधी एसटी महामंडळाचे चेअरमन अनिल परब यांची प्रस्तावावर सही घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या दरवाढीला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. सोमवारी याबाबत प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच एसटी महामंडळ नेमकी किती दरवाढ करणार, याबाबतची माहिती समोर येईल असे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.