Mumbai : पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढा : राज ठाकरे

एमपीसी न्यूज – संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत आहे. मात्र, डॉक्टर आणि पोलिसांवर काहीजण हल्ले करीत आहेत. त्यांच्यावर थुंकत आहेत. अशा समाजकंटकांना सरळ फोडून काढले पाहिजे. त्यांना फोडून काढतानाच व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले पाहिजेत, असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ( शनिवारी ) पत्रकरपरिषदेत व्यक्त केले.

मरकजमधला प्रकार संतापजनकच. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावं असं वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्ले करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. पोलसांवरील हल्ले खपून घेऊ नका. त्यांच्यावर केवळ केसेस टाकून जमणार नाही, त्यांना सरळ फोडून काढायला हवे. त्यांना फोडून कढतानाचे व्हिडिओ व्हायरल केले तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्याना कोणती शिक्षा मिळते हे सर्वाना समजेल, असे ठाकरे म्हणाले.

नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्यानी घेतले पाहिजे. कारण लॉकडाऊनला वाढविला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. शिस्त पाळली नाही तर आर्थिक संकट निर्माण होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. देशात राष्ट्रीय आपत्ती असताना पोलिसांचे खच्चीकरण करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

 

1) लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. ह्या सगळ्यावर जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती म्हणजेच पंतप्रधान. ते त्यांच्या ‘जनसंवादात’ काही बोलतील अशी मला अपेक्षा होती.

2) पंतप्रधान म्हणालेत त्याप्रमाणे लोकं दिवे घालवतील, टॉर्च लावतील जर त्याने काही फरक पडणार असेल तो पडू दे. पण ह्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात जर ‘येणाऱ्या आर्थिक अरिष्टावर आपण कशी मात करू शकू? याबाबत थोडासा आशेचा किरण जरी दिसला असता तरी फरक पडला असता.

3) मरकजमधला प्रकार संतापजनकच. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावं असं वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे.

4) वसईमध्ये मरकजला परवानगी नाकारल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन. दिल्ली पोलिसांना ह्याचा धोका लक्षात आला नाही. अर्थात कोणाला दोषी ठरवणं किंवा धर्म इत्यादी विषयांवर बोलण्याची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधल्या असल्या ज्या काही औलादी आहेत त्यांना आजच ठेचून काढलं पाहिजे.

5) निवडणुकीच्या वेळेस मुल्ला मौलवी मतदान कुणाला करावं, ह्याचे फतवे काढतात.ते आत्ता का गप्प आहेत आणि मग जर ह्यांच्या असल्या धिंगाण्यावर उद्या सरकारने काही कडक कारवाई केली किंवा एखाद्या पक्षाने समजा काही भूमिका घेतली तर तेंव्हा काही बोलायचं नाही.

6) आजपर्यंत सर्व सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे पुरेसं लक्ष दिलं नाही. त्यामुळे आजची परिस्थिती अधिक गंभीर आहे. किमान भविष्यात तरी आरोग्यावर बजेटमध्ये मोठी तरतूद असायला हवी.

7) डॉक्टर्स असोत, शेतकरी असोत, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी असोत, पोलीस असोत, अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी असोत की माध्यमातील कर्मचारी असोत, सर्व जण जिवावर उदार होऊन काम करत आहेत.

8) पोलिसांचं मनोधैर्य खचवून चालणार नाही. त्यांच्यावर जर हल्ले होत असतील तर त्या हल्लेखोरांना फोडून काढा, कठोर शासन करा.

9) जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहचाव्यात ह्यासाठी सरकारने अधिक योग्य नियोजन करायला हवं. ह्या काळात काळा बाजार करणाऱ्यांनाही फोडून काढल पाहिजे.

10) माझी लोकांना हात जोडून विनंती आहे की, हा लाॅकडाऊन गांभीर्याने घ्या. कारण जर आज तुम्ही गांभीर्याने नाही घेतलं तरी सरकारला नाईलाजाने लॉकडाऊन वाढवावा लागेल आणि त्याचे आर्थिक परिणाम गंभीर असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.