Pune News : मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प, संगम पूल ते येरवडा अंदाज पत्रक बनविण्यास स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – मुळा-मुठा नदीकाठ विकास योजनेअंतर्गत संगम पूल ते येरवडा पर्यंतच्या अंदाजे चार किलोमीटर अंतरासाठी अंदाज पत्रक (एस्टीमेट) तयार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर लांबीच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्याची पुणे महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मुळा-मुठा नद्या वाहतात. नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्याला राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘या प्रकल्पासाठी नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, डिझाईन नकाशे तयार करणे, भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चित करणे, नदीच्या दोन्ही बाजूंच्या मिळकतींची मोजणी, सविस्तर प्रकल्प अहवाल आदी काम पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी ७६८ हेक्टर क्षेत्र लागणार आहे. नदीच्या वहनासाठी ५२६ हेक्टर, नदीच्या मजबुतीकरणासाठी १८० हेक्टर आणि विविध सुविधा पुरविण्यासाठी बासस्ट हेक्टर क्षेत्र लागणार आहे.’

या प्रकल्पामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता वाढणार आहे. पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविता येणार आहे. नदीकाठचे सुशोभीकरण होणार आहे, संपूर्ण नदीकाठ परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. नदीकाठची वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी उद्याने, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्प राबविण्यासाठी दोन हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती ही रासने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.