Talegaon Dabhade Crime News : ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर लुटणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या योगेश सोहनी यांना लुटणाऱ्यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 13) रात्री सुसरोड येथे ही कारवाई केली. हा प्रकार शनिवारी (दि. 8) मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडला होता.

योगेश सुरेश गिरी (वय 37, रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिनेता योगेश माधव सोहनी (वय 32, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) याने सोमवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी शनिवारी एक्सप्रेस हायवे वरून पुण्याकडे जात होते. त्यावेळी सोमाटणे फाटा येथे आरोपी गिरी याने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे फिर्यादी सोहनी यांनी गाडी थांबवली. तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताचे कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायची नसेल तर तू एक लाख पंचवीस हजार रुपये दे नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल, असे सांगून आरोपी वाहन चालकाने फिर्यादी सोहनी यांना भिती दाखवली.

तसेच, आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथील एटीएममधून 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडून फिर्यादी सोहनी यांच्याकडून ती रक्कम घेऊन निघून गेला. त्यानंतर सोहनी यांनी सोमवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, आरोपी गिरी हा सुसरोड येथे येणार आहे. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून गिरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसात चोरी, जबरी चोरी, खंडणी, फसवणूक असे 17 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जीनेडी, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

अभिनेता योगेश सोहोनी म्हणाला, “घटना घडल्यापासून पिंपरी- चिंचवड पोलीस माझ्या कायम संपर्कात होते. अवघ्या दोन दिवसात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. त्यांचे मानावे तेवढे अभार कमी आहेत. एवढी सक्षम पोलिस यंत्रणा असताना नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेसाठी माझा त्यांना सॅल्युट आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.