Talegaon Dabhade News : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरण; डॉ. डांगे यांचे पोलीस महासंचालक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना साकडे

एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने तळेगाव मधील डॉक्टरची दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून मावळातील तळेगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना साकडे घातले आहे.

डॉ. श्रीहरी डांगे यांनी सोमवारी (दि. 20) पोलीस महासंचालकांना निवेदन दिले. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हेही त्यांच्या समवेत होते.

डॉ. डांगे यांचे तळेगाव दाभाडे येथे श्री डायग्नोस्टिक सेंटर आहे. डॉ. डांगे आणि त्यांच्या पत्नी ते डायग्नोस्टिक सेंटर चालवतात. व्यवसायाची गरज म्हणून डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनची गरज होती. त्यासाठी मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीशी त्यांनी संपर्क साधला.

कंपनीने डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनचे कोटेशन पाठवले आणि दोन कोटी चार लाख रुपये आगाऊ मागितले. डॉ. डांगे यांनी सर्व रक्कम आगाऊ दिली. तरीही मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीचे भागीदार तुलसी पितांबरदास मनेक, नीरव हसमुखराय पंचमाटिया, जर्नल सिंग प्रेमसिंग बावा, इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला, डॉ. मेघा निरव पंचमाटिया (सर्व रा. मुंबई) यांनी एमआरआय मशीन पाठवली नाही.

याबाबत डॉ. डांगे यांनी चौकशी केली असता सर्व भागीदार मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) ही कंपनी अन्य व्यक्तीला विकून पसार झाले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरोपींकडे पैसे मागितले. त्यातील भागीदार जर्नलसिंग प्रेमसिंग बावा याने डॉ. डांगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतरही पोलिसांकडून अद्यापि कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. डॉ. डांगे यांनी आपली कैफियत बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे देखील मांडली आहे. पोलीस आयुक्त नागराळे यांना देखील निवेदन देऊन योग्य कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

…. तर मंत्रालयासमोर आंदोलन करणार – प्रदीप नाईक

डॉ. डांगे यांची दोन कोटी पेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. हा फसवणुकीचा प्रकार घडून अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही याप्रकरणी ठोस कार्यवाही काहीच झालेली नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात फसवणूक करणा-या संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.