Pune : शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेवर मेट्रो उभारणार मल्टी मोडल हब

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर बस स्थानकांच्या जागेवर मेट्रो मल्टी मोडल हब उभारणार आहे. त्याच बरोबर स्थानकाला लागूनच असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौकचे मेट्रो नूतनीकरण करणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात अली आहे.  

शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाची १५ हजार ७०० चौरस मीटर जागा आहे. सध्या या जागेवर बसस्थानक, वर्कशॉप व एसटीची कार्यालये आहेत. या जागेवर अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. यामध्ये एस.टी.बस, पीएमपीएमएल बस, शिवाजीनगर रेल्वेस्थानक यांना मेट्रो स्थानकांद्वारे जोडण्यात येणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना ये जा करण्यासाठी शिवाजी नगर बस स्थानक, आकशवाणीकेंद्र, पुणे रेल्वे स्थानक, ही ठिकाणे भुयारी मार्गांनी जोडण्यात येणार आहे.

शिवाजीनगर मेट्रो बसस्थानकाच्या निर्मिती दरम्यान स्थानका जवळील संपूर्ण परिसर विकसित करण्यात येणार आहे. यावेळी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा मातोश्री रमाबाई आंबेडकर चौकचे संपूर्णतः नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील ट्रॅफिकची समस्या कमी होईल व पार्किंग, सायकलट्रॅक, पदपथ, ऑटोरिक्षा पार्किंग, इत्यादी अनेक गोष्टींचे व्यवस्थित नियोजन होणार आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर चौकात ३२.३२ मीटर व्यासाचे मध्यवर्ती भाग सुशोभित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.