Mumabi : बिग बॉस निघाला मुंबई बाहेर; ‘येथे’ असेल नवे घर

एमपीसी न्यूज : प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘ बिग बॉस’चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र, नव्या पर्वासाठी या शोमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी ‘बिग बॉस’चं घर मुंबईत नसेल. मुंबईबाहेर ‘बिग बॉस १४’चं घर बांधण्यात येणार असल्याचे समजते.

त्याचं इंटेरिअर कसं असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’चं घर हा नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यंदा दक्षिण गोव्यात हे घर बांधण्यात येणार आहे. सर्वात आधी लोणावळ्यात हे घर होतं. नंतर मुंबईत आणण्यात आलं, पण आता ते निसर्गरम्य अशा गोव्यात असणार आहे.

मूळचा परदेशी पण आता भारतीय टेलिव्हिजनवर चांगलाच टीआरपी मिळवलेला शो म्हणजे बिग बॉस. अभिनेता सलमान खान याचे सूत्रसंचालन करतो. तेदेखील प्रेक्षकांना खूप आवडते. त्यात सलमान सहभागी कलाकारांना चांगले सुनावत असतो, ते प्रेक्षकांच्या मनोमन पटते. या स्टार्सचे हे नखरे, लटके, झटके, खोटी खोटी भांडणे प्रेक्षक एन्जॉय करतात. बिग बॉस या शोवर कितीही टीका झाली तरी तो आवर्जून बघितला जातो. विविध भाषांमधून देखील हा शो आपल्या भेटीला येतो.

या नव्या पर्वाच्या पहिल्या स्पर्धकाचं नावसुद्धा समोर आलं आहे. ‘एनडी टीव्ही’नं दिलेल्या वृत्तानुसार, मॉडेल, अभिनेत्री व गायिका पूनम कारेकर या पर्वाची पहिली स्पर्धक आहे. याशिवाय जास्मिन भसिन, अलिशा पवार, करण कुंद्रा ही नावंसुद्धा चर्चेत आहेत.

‘बिग बॉस’चा प्रत्येक सीझन वेगवगळ्या कारणाने गाजला होता. किंबहुना त्यातील स्पर्धकांनी तो कसा गाजेल याची पुरेपूर काळजी घेतली होती. तेरावा सिझन चांगलाच गाजला होता. शोची टीआरपी वाढविण्यासाठी निर्मात्यांकडून नवनवीन शक्कल लढवले गेले. दिवसेंदिवस या शोची घसरती पातळी पाहून अनेकांनी या शोवर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.

‘बिग बॉस १३’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ठरला होता. मात्र, त्याच्या विजेतेपदावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.