Mumbai : कोरोनामुळे चित्रीकरणाची शैली बदलून जाईल – दिग्दर्शक नितेश तिवारी

Mumbai: Corona will change the style of cinematography - Director Nitesh Tiwari

एमपीसी न्यूज :  सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोनाच्याच बातम्या आहेत. कोरोनाच्या नंतर काय याचा अजून कोणी विचारच करत नाही. पण भविष्यकाळाचा आढावा घेतला तर आत्ताच्या आणि पुढच्या परिस्थितीत खूप फरक पडणार आहे एवढे मात्र नक्की. सगळ्यात मोठा फटका चित्रीकरणाला बसणार आहे. त्याचे नियोजन कसे करायचे यावर विचारविनिमय सुरु झाले असतीलच. यातच चित्रीकरणाची शैलीच पूर्णपणे बदलून जाईल, असा दावा दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केला आहे.

एका मुलाखतीत नितेश यांनी चित्रीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर गप्पा मारल्या. ते म्हणाले, कोरोनामुळे समाजाच्या सगळ्याच क्षेत्रात यापुढे आमूलाग्र बदल होणार आहेत. मनोरंजन क्षेत्रदेखील याला कसा बरं अपवाद ठरेल? सध्या सुरु असलेले सोशल डिस्टन्सिंगचे नियम पुढेदेखील चालूच ठेवावे लागतील. त्यामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा येणार आहेत.

‘कुठल्याही चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या चित्रीकरणात अनेकदा शेकडो लोक एकाच ठिकाणी हजर असतात. यामध्ये कॅमेरामॅनपासून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. परंतु भविष्यकाळात ही गर्दी पाहायला मिळणार नाही. कारण अशा गर्दीत सोशल डिस्टन्सिंग नियम पाळणं शक्य होणार नाही.

काही ठराविक लोक सेटवर हजर असतील आणि बाकीचे व्हर्चुअली कनेक्टेड असतील. दिग्दर्शक देखील व्हिडीओ कॉलव्दारे चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसेल. पटकथा लेखक, संगीतकार, कॅमेरा टीम, एडिटर्स, टेक्निशियन यांच्यासोबत होणाऱ्या मिटिंग्स यापुढे व्हिडीओ कॉलव्दारे होतील.

अशा प्रकारे संपूर्ण चित्रीकरणाची शैली बदलेल.’ असा दावा त्यांनी केला आहे. एका दिग्दर्शकाने मांडलेल्या मतावर सगळ्यांनी विचार करणे नक्कीच गरजेचे आहे.

नितेश तिवारी बॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘चिल्लर पार्टी’, ‘पंगा’, ‘छिछोरे’, ‘दंगल’, ‘भूतनाथ रिटर्न’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.