Mumabi : जाणून घेऊया ‘अशोक मामा’ या नावामागील कथा !

एमपीसी न्यूज : सत्तर-ऐंशीच्या दशकापासून आपल्या उत्स्फूर्त विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. जेव्हा मराठी सिनेमा तमाशापटात अडकला होता तेव्हा त्याला त्यातून बाहेर काढून विनोदाचे अचूक टायमिंग साधत अशोक सराफ यांनी बाजी मारली होती.

त्यांच्या नावावर तेव्हा चित्रपट हातोहात खपत होता. शिवाय जोडीला त्यांनी नाटक, हिंदी सिनेमातून देखील काम केले. इंडस्ट्रीमध्ये त्यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यांच्या नावामागे काय कहाणी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नावामागची खरी कहाणी सांगितली आहे. त्याचसोबत एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ यांचा हा फोटो आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, ‘गुरू-शिष्य…मोठी बहीण विजया अशोक कुमारांची खूप मोठी चाहती. त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं.

अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ. चतुरस्त्र अभिनेता आज ७२व्या वर्षीही तितक्याच ताकदीने उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरुस्थानी मानतो आहे.’अशोकमामांनी पुढे अशोककुमार यांच्या बरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये भूमिका देखील साकारली.

विनोदाचा सम्राट म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही वयाच्या ७२ व्या वर्षीसुद्धा ते तितक्याच समरसतेने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं होतं. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अशोक मामांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.