Mumabi : बघा उत्तर रामायणातला ‘कुश’ कसा सापडला ते…

एमपीसी न्यूज : दुनियादारीतला ‘श्रेयस’, मुंबई – पुणे – मुंबईमधला ‘गौतम’, मितवामधला ‘शिवम’ म्हणजे कोण बरं हे मी सांगायलाच नको. तुम्हाला सगळ्यांना माहितेय, आपला लाडका स्वप्निल जोशी. आणि सगळ्यांनी आता त्याला बालकलाकार म्हणून दूरदर्शनवर बघितले देखील असेल. नुकत्याच संपलेल्या उत्तर रामायणमध्ये छोट्या स्वप्निलने ‘कुश’ ही भूमिका अत्यंत ताकदीने पेलली होती.

अर्थात या भूमिकेसाठी त्याला बोलावण्यामागे होते ते दिग्दर्शक रामानंद सागर. त्यांच्या पारखी नजरेने स्वप्निलमधील अभिनयाचे बीज ओळखले आणि त्याला आधी ‘कुश’ या भूमिकेसाठी निवडले. नंतर त्यांच्याच ‘कृष्णा’ या मालिकेत स्वप्निल खट्याळ, खोडकर कृष्ण म्हणून चमकला.

सध्या दूरदर्शनवर या जुन्या लोकप्रिय मालिका पुन:प्रसारित होत आहेत. त्याचबरोबर मालिकेतील कलाकार देखील पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत. या कलाकारांना त्यावेळी भूमिका कशा मिळाल्या, त्यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से जाणून घ्यायला चाहते फार उत्सुक आहेत. उत्तर रामायणात स्वप्निलला भूमिका कशी मिळाली हे त्याने या निमित्ताने सांगितले.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विलास राज यांच्यामुळे स्वप्निल जोशीला रामानंद सागर यांच्या उत्तर रामायणात भूमिका मिळाली होती. विलास राज यांनी रामायण व महाभारत यामध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ते रामानंद सागर यांच्या ओळखीतले होते. ते एकदा गणेशोत्सवाच्या वेळी स्वप्निलच्या गिरगाव येथील चाळीत आले होते. त्यावेळी स्वप्निलने एका नाटकात काम केले होते. ते त्याचे काम विलास राज यांना आवडले.

त्यामुळे ते स्वप्निलच्या घरी गेले आणि त्याच्या वडिलांकडून त्याचा फोटो घेऊन तेथून निघून गेले. तो फोटो विलास यांनी सागर आर्ट्स प्रोडक्शनमध्ये दिला. छोट्या स्वप्निलचा तो फोटो पाहून रामानंद सागर यांना मनापासून आवडला. त्यांनी मनोमन उत्तर रामायणमधला कुश फिक्स केला. मात्र, त्यावेळी स्वप्निलच्या घरात फोन किंवा टीव्ही नव्हता. संपूर्ण चाळीत स्वप्निलच्या शेजारी राहणाऱ्या काकूंकडेच फोन होता. सागर आर्ट्समधून त्या नंबरवर फोन करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

स्वप्निलचे वडील मोहन जोशी यांच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. पण स्वप्निलच्या वडिलांना ही कोणीतरी गंमत करत आहे असे वाटले. त्यांनी त्यावर काहीही रिस्पॉन्स दिला नाही. पण लागोपाठ सहा दिवस सतत सागर आर्ट्समधून फोन येतच होता.

अखेर सातव्या दिवशी मोती सागर यांनी फोन केला आणि त्यांनी मला स्वप्निलच्या वडिलांशी बोलायचे आहे तुम्ही त्यांना एकदा बोलवा असे सांगितले. ‘रामायण मालिका संपल्यानंतर मालिकेत काम केलेल्या अनेक लोकांची नावे तेथे दिसायची. त्यातील मोती सागर हे नाव सर्वांना माहित होते.

त्यामुळे ज्या काकूंनी फोन उचलला होत्या त्यांना ते खरं वाटू लागले. कारण गेल्या ६ ते ७ दिवसांपासून फोन येत होते. त्या धावत आमच्या घरी आल्या आणि माझ्या वडिलांना मोती सागर यांचा फोन आहे असे सांगू लागल्या. माझ्या वडिलांनी देखील ते नाव ऐकले होते. त्यामुळे ते गेले आणि फोनवर बोलू लागले असे स्वप्निल म्हणाला.

त्यावेळी मोती सागर हे माझ्या वडिलांवर नाराज होते. फोनवर बोलायचे नाही तर मुलाचा फोटो आमच्या ऑफिसमध्ये का पाठवला? असा प्रश्न त्यांनी माझ्या वडिलांना विचारला. त्यावर माझ्या वडिलांनी विलास राज घरी आले होते आणि त्यांनी स्वप्निलचा फोटो घेतला होता असे म्हटले. त्यानंतर नेमकं काय झाले होते हे समोर आले.

विलास राज यांनी स्वप्निलचा फोटो सागर आर्ट्स प्रोडक्शनमध्ये दिला होता आणि स्वप्निलच्या वडिलांना याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोती सागर यांनी आम्ही आमच्या लव कुश या मालिकेसाठी कलाकार शोधत आहोत आणि तुमच्या मुलाचा फोटो मला आवडला आहे.

पुढे याच स्वप्निलने कृष्ण आणि विलास राज यांनी कंस साकारला. त्याची अभिनय क्षेत्रातली घोडदौड सुरु झाली. ती आजही सुरुच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.