Mumbai : दिवसभरात नवीन 117 रुग्ण, 8 मृत्यू, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1135 वर, मृतांचा आकडा 72!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात आज 117 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1135 झाली आहे. आज राज्यात 8 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैंकी 5 मुंबईत तर 2 पुणे येथे तर 1 कल्याण डोंबिवलीमधील आहे. कोरोना (कोविड 19)मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 72 झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

1) काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

2) काल संध्याकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला मधुमेह होता.

3) काल दुपारी मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

4) दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात कोविड 19 बाधित रुग्णाची सहवासित असणा-या 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला अस्थमा आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

5) आज सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका 59 वर्षीय महिलेचा कोविड१९ मुळे मृत्यू झाला.

6) आज पहाटे पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह होता. त्याने प्रदेश प्रवास केलेला नव्हता.

7) पुण्याच्या 55 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात काल कोविड 19 मृत्यू झाला.

8) कल्याण डोंबिवली येथील 55 वर्षीय स्त्रीचा बाबू जगजीवनराम रुग्णालय, मुंबई येथे 6 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांना फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27,090 नमुन्यांपैकी 25,753 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1,135 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 117 करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 34,904 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4,444 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 25 जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा जिल्ह्यात 6 आणि प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एकजण रत्नागिरी, नागपूर ,हिंगोली, जळगाव आणि वाशीममधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनर्मेट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

सध्या मुंबईत 645, बुलढाणा 198, वसई विरारमध्ये 183, मीरा भाईदर मनपामध्ये 200 तर ठाणे मनपामध्ये 331 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 3658 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.