Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 203, मृतांचा आकडा आठ

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाच्या 22 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. राज्यातील ही रुग्णसंख्या आता 203 झाली आहे. काल मरण पावलेल्या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाबाधित मृतांचा आकडा वाढून आठवर पोहचला आहे. 

या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 10 रुग्ण मुंबईचे असून पाच रुग्ण पुण्याचे, तीन नागपूरचे,  दोन अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण 35 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात करोना बाधित मृतांचा आकडा दोनने वाढला आहे. एका 40 वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तो मधुमेही होता. न्यूमोनियमावरील उपचारांसाठी तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचाही कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोरोनाबाधित मृतांच्या यादीत त्यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.