Mumbai : राज्यातील 26 ‘करोना’बाधित रुग्णांना ‘डिस्चार्ज; आज नवीन 28 रुग्णांची नोंद, राज्यातील एकूण रुग्ण संख्या 186

कोरोनाबाधित 104 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही

एमपीसी न्यूज – आज राज्यात आणखी 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 186 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 22 रुग्ण मुंबईचे आहेत, तर चार रुग्ण पुण्याचे व दोन रुग्ण नागपूर येथील आहेत.

सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या 104 रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो करोना मुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता सहा झाली आहे.

राज्यात आज एकूण 323 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 3816 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3391 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटीव्ह आले आहेत तर 186 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 26 करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 17,295 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5928 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.