Mumbai : महाराष्ट्रात ‘करोना’ बाधित नवीन 28 रुग्णांची नोंद!; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 153

महाराष्ट्रात २४ 'करोना' बाधित रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; राज्यातील 'करोना बाधित'चा पाचवा बळी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात आज आणखी २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण ‘करोना’बाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर, सांगलीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या ४ सहवासितांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर. कोल्हापूर. गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुण आढळला आहे तर ९१ रुग्ण गुजरात राज्यातील आहे.

दरम्यान, आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृध्देचा ‘करोना’मुळे मृत्यू झाला. हा राज्यातील करोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका ८५ वर्षीय डॉक्टरांचा संशयित करोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.

राज्यात आज एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत २२ ‘करोना’बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६, ५१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १०४५ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.