Mumbai : लॉकडाऊनच्या काळात राज्यात 458 सायबर गुन्ह्यांची नोंद; व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून सर्वाधिक चुकीच्या पोस्ट होताहेत शेअर

Mumbai: 458 cybercrimes recorded in the state during lockdown; the most objectionable posts were shared on WhatsApp, Facebook महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जाहीर केली आकडेवारी

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणू, त्यावरील उपचार, औषध आणि इतर बाबींचा खोटा प्रचार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात 458 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचा वापर झाल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 458 गुन्हे दाखल झाले असून 250 व्यक्तींना अटक केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 5 जून 2020 पर्यंत एकूण 458 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 27 अदखलपात्र गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.

दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबर विभागाने तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 190 गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 184 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत.

इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, YouTube) गैरवापर केल्याप्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 250 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स हटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच एका सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 14 वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोनाग्रस्त रुग्णांची चुकीची माहिती असणारी पोस्ट शेअर करून अफवा पसरविली होती. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकजण ‘आपल्या भारतीय इतिहासात कोरोनावरील उपचार सांगितले आहेत’ अशी चुकीची माहिती असणारे मेसेजेस व पोस्ट्स फेसबुक, व्हाट्सॲप इत्यादी सोशल मीडियावर फॉरवर्ड किंवा शेअर करत आहेत.

अशा मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवून स्वतःवर किंवा आपल्या घरातील इतरांवर कोणतेही प्रयोग करू नका. तसेच अशा मेसेज मधील माहितीची खातरजमा तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्या. असे मेसेज फॉरवर्ड करू नये, कारण खोटी माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.