Mumbai: तलाव ठेका रक्कम भरण्यास आणि मासेमारी परवान्यांच्या नूतनीकरणास 6 महिन्यांची मुदतवाढ

Mumbai: 6-month extension for payment of lake contract and renewal of fishing licenses कोळंबी संवर्धन प्रकल्पांचे वीज देयक भरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- क्यार व महा चक्रीवादळ तसेच कोरोना प्रादुर्भाव यामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळावा यासाठी मत्स्यविभागाच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तलाव ठेका रक्कम भरण्यास आणि मासेमारी परवान्यांच्या नूतनीकरणास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

मत्स्यव्यवसाय मंत्री शेख म्हणाले, “राज्यातील सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना टाळेबंदीच्या काळात संपला असल्यास नूतनीकरणासाठी 1 एप्रिल 2020 पासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तसेच 30 जून 2017 आणि 3 जुलै 2019 रोजीच्या दोन शासन निर्णयांनुसार मासेमारीसाठी ठेक्याने दिलेल्या तलावांची चालू वर्षाची तलाव ठेका रक्कम व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्राची लॉकडाऊन कालावधीत येणारी चालू वर्षाची भाडेपट्टीची रक्कम भरणे यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्याच प्रमाणे पिंजरा पध्दतीने मत्स्य संवर्धनासाठी देण्यात आलेल्या ठेक्याची रक्कम या कालावधीत आल्यास ती भरण्यास आणि निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन/ कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या परवान्याच्या नूतनीकरणास देखील सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोळंबी संवर्धन प्रकल्पांचे वीज देयक भरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून पत्र देण्यात आले असल्याचे मंत्री शेख यांनी सांगितले.

आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमार बांधवांना मत्स्यव्यवसाय विभागाच्या या निर्णयांमुळे दिलासा मिळणार असल्याचा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.