Mumbai: राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस राजस्थानला रवाना

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी राजस्थानातील कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस राजस्थानला रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेऊन माघारी येतील.

राज्यात शिक्षणाचा जसा ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो  विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती.  लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही.

अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी चर्चा करुन कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बसेस रवाना केल्यात. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेवून माघारी येतील.

कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्याच्या पालकांची  मागणी लक्षात घेता राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांचेशी चर्चा करुन धुळे जिल्ह्यातील 70 बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली होती. आज त्याची अंमलबजावणी झाली.

त्यानुसार आज धुळे येथून 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या. धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील. व त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.