Mumbai : शाळांनी ‘जादा फी’ आकारल्यास होणार कारवाई -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्क वाढ करू नये आणि जर शाळांनी जादा शुल्क आकारले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

येत्या शैक्षणिक वर्षाची शालेय फी भरण्यासाठी पालकांना शाळेकडून निरोप दिले जात आहेत आणि फी भरण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी दखल घेऊन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्क वाढ करू नये, असे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा सुद्धा 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले जात आहे. यंदा शैक्षणिक शुल्कात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा विचार शैक्षणिक संस्था करत आहेत आणि पालकांना त्वरित फी भरण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आठवी पर्यंतच्या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या होत्या तसेच नववी आणि अकरावी यांचे शैक्षणिक मुल्यांकन सुद्धा पहिल्या सत्रातील गुणांवर आधारित करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी सांगितले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.