Mumbai: रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब याचा पुरेसा साठा उपलब्ध – डॉ. राजेंद्र शिंगणे

Adequate stock of remedesivir and tocilizumab available - Dr. Rajendra Shingane

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे महाराष्ट्रभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

डॉ. शिंगणे यांनी नुकतीच मुंबई शहरातील काही औषध वितरक व रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधाची उपलब्धता, त्यांचे वितरण व आकारण्यात येणारी किंमत याबाबत माहिती घेतली.

यासंदर्भात त्यांनी आज अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकांचे प्रतिनिधी, वितरक/ विक्रेते यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

सध्याचा उपलब्ध साठा, भविष्यात उपलब्ध होऊ शकणारा साठा तसेच वितरण प्रणाली व त्यातील दोष दूर करणे या बाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून केले जाते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी या औषधाची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सूचना डॉ. शिंगणे यांनी संबंधित कंपनीला दिल्या.

रेमडेसिवीर चे-21500 व्हायल्स येत्या आठवड्यात

महाराष्ट्रासाठी येत्या आठवड्यात रेमडेसिवीर या औषधाचे साधारणत: 21500 व्हायल्स उपलब्ध होणार असे उत्पादकांच्या प्रतिनिधीने या वेळी सांगितले.

तसेच टोसीलीझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्याकारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुध्दा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करुन राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करावेत असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

मुंबई व ठाण्यामधील कार्यरत औषध निरीक्षक, सहायक आयुक्त (औषधे), सह आयुक्त (औषधे) यांची बैठक घेऊन या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत.

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र, या औषधांचा उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे.सध्या मे. हेट्रो रेमडेसिवीरचे उत्पादन हैद्राबाद येथे करीत आहेत व लवकरच नवसारी गुजरात येथे करणार आहेत.

मे. सिप्ला यांचे रेमडेसिवीरचे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरु असून, भविष्यात गोवा येथे करणार आहेत. केंद्र शासनाकडून अनुमती मिळालेली आहे व यांचे उत्पादनसुध्दा बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या औषधाचा पुरवठा वाढण्यास मदत होईल.

सदर औषधे डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच रुग्णास प्रिस्क्राईब करावे. तसेच या औषधाच्या काळाबाजार करणाऱ्यांबाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.