Mumbai : अमित गोरखे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला दिली दिशा

शैक्षणिक, व्यावसाय वृध्दीस चालना देऊन साधले समाजाचे हित - अमित गोरखे

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचा कार्यकाल राज्यातील सरकार बदलल्यानंतर संपुष्टात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे मिळालेल्या सहा महिन्यांच्या अल्प कालावधीत  नियोजनबध्दरित्या आपल्या कार्यप्रणालीतून त्यांनी समाजासाठी योजनांना गती दिली, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला साजेशा कार्यक्रमांची आखणी करत महामंडळाला दिशा ठरवून देण्याचे काम केले. दरम्यान, यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निधी, कर्ज मंजुरी आणि कौशल्य विकासाद्वारे समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक वृध्दीस चालना दिली, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी 18  मार्च 2020 रोजी दहा महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची नियुक्तीही रद्द केली आहे. परंतु, राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले हे अध्यक्षपदाच्या माध्यमातून अवघे चार महिने काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या अल्प कालावाधीत अमित गोरखे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा नेमका उद्देश समोर ठेवून कार्यप्रणाली राबविली. त्यामुळे समाजासाठी नेमक्या योजना आणि कार्यक्रमांची आखणी करण्यास त्यांना यश आले.

या संदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मावळते अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, “महामंडळाचा अध्यक्ष म्हणून 7 जून 2019 रोजी नियुक्ती झाली. दहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला आहे. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खऱ्या अर्थाने मला फक्त सहा महिन्याचा कालावधी मिळाला. अत्यंत कमी कालावधी मिळाल्याने तशी काम करण्याची फारशी संधी मला मिळाली नाही. परंतु, मिळालेल्या संधीचा पूर्णपणे समाजासाठी उपयोग कसा करता येईल. याकडे लक्ष दिले. मातंग व तत्सम 12 पोटजातींतील समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक वृध्दीवर भर देण्याच्या उद्देशाने समाजातील तरुण-तरुणींना एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणला. स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी दहा कोटीचा निधी मंजूर करून घेतला. समाजातील गरजू स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी बीज भांडवल योजनेतून कर्ज मंजूर करून घेतले. या योजनांसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी त्यांचे टपाल तिकिट मुंबईत मोठा सोहळा घेऊन प्रकाशित केले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेण्यात यश आले.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ यापूर्वी झालेल्या कथित घोटाळ्यामुळे वारंवार बदनाम झाले होते. परंतु, साहितरत्न अण्णा भाऊ यांचा आदर्श समोर ठेवून बदनाम झालेले महामंडळ कामाच्या माध्यमातून सुस्वव्यवस्थितरित्या मार्गावर आणण्याचे काम केले, याचा विशेष आनंद आहे. महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सुधीर मनगुंटीवार, पंकजा मुंडे, तसेच शहराचे तत्कालीन अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नेते सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे या सर्वांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले, असे गोरखे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.