Mumbai: …आणि लॉकडाऊनमध्ये राज ठाकरे यांनी खुला केला व्यंगचित्रांचा खजिना!

...रेषा जणू काही जिवंत झाल्या!

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – एखाद्या चित्रकाराला चित्र रंगवताना आपले सगळे कसब पणाला लावावे लागते. कारण त्याला त्या चित्रातून सगळी वैशिष्ट्ये दाखवावी लागतात. पण त्यापेक्षाही जास्त कसब असते ते व्यंगचित्रकारांमध्ये. कारण त्यांना मोजक्या रेषांच्या साहाय्याने ती व्यक्ती हुबेहुब लोकांसमोर उभी करावी लागते. हे सगळं आज आठवण्याचे कारण म्हणजे पाच मे,  जागतिक व्यंगचित्र दिन! सध्या आपल्याला सडेतोड राजकारणी म्हणून परिचित असलेल्या राज ठाकरे यांच्यात असाच एक व्यंगचित्रकार आहे. काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून कलाक्षेत्रात रमलेल्या राज यांच्याजवळ व्यंगचित्रकाराची तरबेज नजर आहे. व्यंगचित्र दिनानिमित्त राज यांनी त्यांच्या ट्विटरवर त्यांच्या जुन्या व्यंगचित्रांचा खजिना रसिकांसाठी शेअर केला आहे.

‘चेहरे-मोहरे’ या नावाने राज ठाकरे यांनी 1999 साली एक प्रदर्शन भरवले होते. त्यात त्यांनी अनेक नामवंतांना आपल्या कुंचल्याने रेखाटले होते. या वेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे उपस्थित होते. तसेच लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांनी देखील विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी राज यांनी आपल्या रेषांनी अनेक चेहऱ्यांना बोलके केले होते. यात बाळासाहेब, लतादीदी, अमिताभ, गदिमा, एम. एफ. हुसेन तर होतेच पण भारतीय राजकारणातील भीष्मपितामह लालकृष्ण अडवानी चक्क भीष्माचा वेष करुनच होते. आपल्या पोपटासारख्या नाकाने लक्ष वेधून घेणा-या इंदिराजी होत्या. तसेच व्यंगचित्राच्या भाषेतील सोप्पे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, ज्येष्ठ असे जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, बाबू जगजीवनराम, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, चौधरी चरणसिंह, जयललिता, मोरारजी देसाई, संघाच्या वेषातील प्रमोद महाजन,  मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, संजय गांधी आदी राजकारण्यांना राज यांच्या रेषांनी बोलके केले होते. तसेच कलाक्षेत्रातील सदाबहार व्यक्तिमत्व देव आनंद, अनिल कपूर, संगीतकार आर. डी. बर्मन आणि भप्पी लाहिरी होते.  परदेशी व्यक्तिमत्वात प्रामुख्याने मायकेल जॅक्सन, हिटलर, वॉल्ट डिस्ने, प्रिन्स चार्ल्स आणि आपल्या रंगेल प्रेमप्रकरणामुळे तेव्हा चर्चेत असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे व्यंगचित्रदेखील होते.

तसेच राज यांची व्यंगचित्र काढताना एकतानता झालेली भावमुद्रा देखील आत्ता लक्ष वेधून घेत होती. सध्याच्या या ताणतणावाच्या काळात ही व्यंगचित्रे पाहताना जणूकाही वाळवंटाच एखादे ओअॅसिस सापडल्याची भावना होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.