Mumbai :’ कोरोना’ टेस्ट किटसाठी अनुराग कश्यप करणार फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव

एमपीसीन्यूज : नेहमी आपल्या सडेतोड आणि रोखठोक विधानांमुळे चर्चेत असणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी त्याने सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. त्यासाठी त्याने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या ट्रॉफीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावातून मिळणारे पैसे तो टेस्ट किटसाठी देणार असल्याची माहिती त्याने ट्विटरद्वारे दिली आहे.

सध्या देशात चौथा लॉकडाऊन सुरु आहे. मृत्यू दर कमी असला तरी रुग्णांची संख्या वाढती आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी  अनेक बॉलिवूड कलाकार देखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

अनुराग कश्यपला ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तो याच ट्रॉफीचा लिलाव करणार आहे. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.

अनुरागचाच कित्ता आता कॉमेडियन कुणाल कामरा आणि वरुण ग्रोवर गिरवणार आहेत. वरुण देखील त्याच्या ट्रॉफीचा लिलाव करणार आहे.

कुणाल कामराने त्याच्या यूट्यूब बटणाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या कलाकारांना ३० दिवसांमध्ये १३ लाख ४४ हजार रुपये कोविड-१९ च्या टेस्ट किटच्या खरेदीसाठी जमा करायचे आहेत.

वरुण ग्रोवरने त्याच्या ट्विवटर अकाऊंटवर ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. ही ट्रॉफी त्याला ‘मोह-मोह’ या गाण्यासाठी मिळाली होती.

ट्रॉफीचा फोटो शेअर करत त्याने म्हटले आहे की, ‘मी २०५०मध्ये ही ट्रॉफी ebay वर टाकून म्हातारपणासाठी पैसे जमा करु शकतो. पण सध्या आपल्या देशाला वाचवणे महत्त्वाचे आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.