Mumbai: आश्चर्यकारक! तब्बल 63 टक्के रुग्णांमध्ये आढळली नाही कोरोनाची लक्षणे

चाचणी झालेल्या रुग्णांपैकी 6.37 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नसले तरी देखील तुम्ही कोरोनाबाधित असू शकता. कोरोनाचे लक्षण दिसत नाही म्हणून तुम्ही कोरोनामुक्त आहात, या भ्रमात राहू नका. याला कारणही तसेच आहे. राज्य शासनाने एक लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांनी या चाचण्यांच्या अहवालांचे विश्लेषण केले असता, ही आश्चर्यकारक बाब पुढे आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी तब्बल 63 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. हीच सर्वात जास्त चिंतेची बाब ठरणार आहे. 

राज्यात कोरोनाच्या एक लाख चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांचे विश्लेषण मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्विवरवर प्रसारित केले आहे. त्यानुसार शासकीय प्रयोगशाळांमध्ये 48 हजार 827 चाचण्या झाल्या तर खासगी प्रयोगशाळांमध्ये 52 हजार 085 चाचण्या झाल्या आहेत. शासकीय प्रयोगशाळांतील 45 हजार 468 चाचण्यांचे अहवाल कोरोना निगेटीव्ह आले आहेत. हे प्रमाण 93.19 टक्के आहे. खासगी प्रयोगशाळांमधील 49 हजार 017 म्हणजेच 94.11 टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेत चाचण्या झालेल्यांपैकी 3,359 जण (6.88 टक्के) तर खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या झालेल्यांपैकी 3,068 जण (5.89 टक्के) कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण 1 लाख 912 चाचण्यांमधून 6,427 जण म्हणजे 6.37 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्यांचे प्रमाण 93.63 टक्के आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे विश्लेषण देखील करण्यात आले आहे. एकूण 6 हजार 427 पैकी 63 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेल्यांचे प्रमाण केवळ 14 टक्के आहे. कोरोनावर मात करण्याची संख्या 957 असून ते प्रमाण 17 टक्के आहे. मृतांचे प्रमाण पाच टक्के आहे तर प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्का आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.