Mumbai: वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचे चौकशीत निष्पन्न – अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – येस बँक व डीएचएफएल घोटाळा प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान व धीरज वाधवान या वाधवान बंधूंना लॉकडाऊन असतानाही खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी परवानगी देणारे पत्र दिल्याचे गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी चौकशीत मान्य केले असून ते पत्र देण्यासाठी त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असेही त्यांनी चौकशीत स्पष्ट केल्याचे त्यासंदर्भातील चौकशी अहवालात म्हटले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊन सुरू असताना वाधवान बंधू आणि त्याच्या कुटुंबाने गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ यांच्या विशेष परवानगीचे पत्र  मिळवले आणि या पत्राच्या साहाय्याने सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आलेल्या
असतानाही वाधवान बंधू. त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि नोकरवर्ग यांनी आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्‍वर असा बेकायदेशीर प्रवास केला. परंतु महाबळेश्‍वरमध्ये प्रशासनाच्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आल्याने 23 जणांविरुद्ध महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्यांच्या पाच आलिशान मोटारीही जप्त करण्यात आल्या. त्यानंतर वाधवान कुटुंबातील 23 जणांना एका हायस्कूलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

देशभर खळबळ उडविणारे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नेमणूक करण्यात आली. सौनिक यांनी ही चौकशी पूर्ण करून त्यांचा अहवाल आज सादर केला, अशी माहिती देशमुख यांनी दिली. गुप्ता यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळेच त्यांनी ते पत्र दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ करून अहवालाची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. वाधवान हे आपले ‘फॅमिली फ्रेंड’ असून आपण त्यांना चांगले ओळखतो. ‘फॅमिलि इमर्जन्सी’साठी त्यांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करावा लागत आहे, असे संबंधित पत्रात म्हटले होते. राजकीय दबाव असल्याशिवाय कोणताही अधिकारी असे पत्र देणार नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.

चौकशी अधिकारी मनोज सौनिक यांनी अमिताभ गुप्ता यांची सखोल चौकशी केली. या चौकशीत वाधवान यांना ‘ते’ पत्र दिल्याचे गुप्ता यांनी कबूल केले. पत्र देण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर शासन त्यावर योग्य तो निर्णय घेईल, असे ते देशमुख म्हणाले. हा अहवाल सार्वजनिक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. देशात कोरोना विरुद्ध लढाई सुरू असताना या पत्रावरून विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले, हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असा शेराही देशमुख यांनी मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.