Mumbai : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी BCCI आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पुढाकार घ्यावा – रोहित शर्मा

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायला मला नेहमीच आवडते. ऑस्ट्रेलिया बरोबर यावर्षी होणाऱ्या 4 कसोटी मालिका मला खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारताचा धडाकेबाज व सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या बरोबर इंन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करताना रोहित याने ही मागणी केली.

रोहित म्हणाला, कोरोना महामारीचा प्रसार कमी झाल्यानंतर क्रिकेट जगतात पहिल्यांदा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका पार पडेल. सध्याच्या कोरोना संकटात प्रवास किंवा परदेश दौरे यास बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने हि मालिका होण्यासाठी काहीतरी करावे, अशी विनंती त्यांने केली आहे.

रोहित पुढे म्हणाला, यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली मालिका भारताने जिंकली होती. आमच्यासाठी ती खूप मोठी कामगिरी ठरली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी मालिका होण्यासाठी काहीतरी करावे, जेणेकरून क्रिकेटचा थरार नागरिकांना पुन्हा एकदा अनुभवता येईल.

दरम्यान, रोहितला मार्च मधील आयपीएल सामने सुद्धा पुढे जाऊन खेळवले जाऊ शकतात, असा विश्वास वाटतो.

आयपीएल बाबत रोहित म्हणाला, आयपीएल सामने सुद्धा खेळवले जाऊ शकतात, पण मला नक्की महिना आणि तारीख सांगता येणार नाही. माझे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेकडे लक्ष लागून आहे. ही मालिका खेळण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचं तो म्हणाला.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व क्रिडा विश्वात शांतता पसरली आहे. क्रिकेट सहीत सर्व प्रकारचे खेळ अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.