IPL 2020 : मुंबईचा चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – इशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जीवावर मुंबईने चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने केलेल्या 114 धावाचं आव्हान मुंबईने सहज पार केले. किशनने नाबाद 68 तर डी कॉकने नाबाद 46 धावा केल्या. 

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सामन्याच्या दुसऱ्यात षटकात जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 2 चेंडूत 2 बळी घेतले. अंबाती रायडू 2 धावांवर तर, जगदीशन शून्यावर माघारी परतला.

स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा फाफ डु प्लेसिसही स्वस्तात बाद झाला. बोल्टने त्याला एका धावेवर माघारी धाडलं. अष्टपैलू रविंद्र जाडेजा गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात 7 धावांवर बाद झाला. अवघ्या 21 धावांत चेन्नईचा निम्मा संघ माघारी तंबूत परतला.

कर्णधार धोनी संयमी खेळत असतानाच राहुल चहरने धोनीला 16 झेलबाद करवले. सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने 47 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने 4 तर बुमराह आणि राहुल चहरने 2-2 बळी टिपले. नॅथन कुल्टर-नाइलनेही 1-1 गडी बाद केला.

चेन्नई ने दिलेल्या 115 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि क्विंटन डी कॉक ही जोडी सलामीला आली. इशान किशनने नाबाद अर्धशतक ठोकलं. त्याने 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 37 चेंडूत 68 धावा केल्या.

क्विंटन डी कॉकने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.