​​Mumbai News : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार

एमपीसी न्यूज : ​रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती ​​मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली असून त्यात जीलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ती कार हटवण्या आली आहे.

अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयीतरित्या उभी करण्यात आली होती. सायंकाळी या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले.

त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये जीलेटीन हे स्फोटक सापडले. पण ​​स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जीलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते. याप्रकरणी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले

 

रात्री गाडी उभी केली!

बुधवारी रात्री उशिरा तिथे गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत काही स्फोटके होती आणि गाडीत वेगवेगळ्या नंबरप्लेटही पोलिसांना सापडल्या. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे, तिथे दोन गाड्या आल्या होत्या. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप माहिती समजलेली नाही.

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील घरापासून काही अंतरावर एका गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. मुंबई पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत. – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीसीटीव्ही ताब्यात​​

मध्यरात्री एक वाजता कारमायकेल रोड परिसरात ही गाडी पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे गाड़ीचा क्रमांक सीसीटीव्हीत स्पष्ट दिसला नाही. परिसरातील अन्य सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकड़ून ताब्यात घेण्यात येत आहे.

जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर होतो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, दगड फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.