Mumbai: ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनात पावणेनऊ लाख जणांच्या सहभागाचा भाजपचा दावा

Mumbai: BJP claims participation of 8.75 lakh people in 'Maharashtra Bachao' agitations

एमपीसी न्यूज – कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनात भाजप कार्यकर्ते व नागरिक मिळून पावणे नऊ लाखपेक्षा अधिक जण सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र भाजपने केला आहे. आंदोलनाला मिळालेल्या जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महाराष्ट्रात कोरोनाबद्दलची अस्वस्थता व निष्क्रिय महाआघाडीच्या विरोधात संतापाची भावना असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे भाजपने म्हटले आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्या बाबत पक्षाच्या वतीने रात्री प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून त्यात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.

कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या निष्क्रीयतेमुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला जनतेकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामळे जनतेतील तीव्र अस्वस्थता स्पष्ट झाली आहे. पक्षाच्या सुमारे अडीच लाख कार्यकर्त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबिय आणि स्थानिक नागरिकांसह एकूण पावणे नऊ लाख लोक या अभिनव आंदोलनात सहभागी झाले, असे भाजपच्या पत्रकात म्हटले आहे.

पक्षाकडे सायंकाळी उशीरा बूथ, तालुका व जिल्हा शाखांकडून सविस्तर अहवाल आले. त्यातून समोर आलेली आकडेवारी अशी – राज्यातील एकूण 572 पक्षीय मंडलांमधील 65,565 बूथमध्ये आंदोलन झाले. एकूण 16 हजार 16 गावे किंवा केंद्रांमध्ये कार्यकर्ते व स्थानिक लोक सहभागी झाले. एकूण अडीच लाख कुटुंबांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यासह सहभागींची संख्या 8 लाख 75 हजार 487 झाली, अशी माहिती भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यासाठी प्रभावी काम करत नाही. राज्यातील विशेषतः मुंबईतील संकट वाढतच चालले आहे. राज्यातील रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार, शेतकरी यांच्यासाठी हे सरकार पॅकेजही घोषित करत नाही. यामुळे कोरोनाच्या संकटात राज्य सरकारवर टीका करायची नाही, हे धोरण बदलून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या समोर हातात फलक घेऊन आंदोलन करावे, असे ठरले. फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळावेत व प्रशासनाला कोणतीही अडचण होऊ देऊ नये असेही सांगण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.