Mumbai: विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे ऐनवेळी डॉ. गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांनी उमेदवारी

Mumbai: BJP replaced candidate For the Legislative Council elections, Ramesh Karad is a new candidate

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून त्यांच्या जागी पक्षाने रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ऐनवेळी भाजपकडून रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगतले व रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

भाजपकडून आठ मे रोजी विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर  शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही भरले होते. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी कोणाचा तरी पत्ता कट होऊन रमेश कराड यांची संधी दिली जाईल, अशी शक्यताही वर्तवली गेली होती. तो अंदाज खरा ठरला असून आता रमेश कराड हे भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत. डॉ. गोपछडे यांचा पत्ता शेवटच्या क्षणी कट झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.