Mumbai: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री

Celebrate Ganeshotsav with social consciousness on the amid Corona pandemic- CM

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांला केले आहे.

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज, गुरुवारी मुंबईतील मंत्रालय येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

शिर्डी, सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही.

त्यामुळे गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊन अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल.

ही साधेपणाची चौकट सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल.

कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेत उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.