Mumbai : मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येतील वाढीबाबत केंद्रीय पथकाने कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही -आयएमसीटी

एमपीसी न्यूज – मुंबई दौऱ्यावर आलेल्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने (आयएमसीटी) शहरातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांचे प्रमाण 30 एप्रिलपर्यंत 42,604 वर आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत 6.5 लाखापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. आयएमसीटीकडून असा कुठलाही अंदाज वर्तवण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की केंद्रीय पथकाने पालिका आयुक्त किंवा महानगरपालिकेच्या अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत असे कोणतेही अंदाज व्यक्त केलेले नाहीत. हे अंदाज पाहिले कि लक्षात येते कि ते काल्पनिक गणिताच्या मॉडेलवर आधारित असून 3.8 दिवसांच्या दुपटीने वाढीच्या दराने मोजलेले आहेत.

मुंबईत सध्याचा दुपटीनं वाढीचा दर 7.1 दिवसांपर्यंत वाढला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नमूद केले आहे कि कोविड -19 प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने देखरेख, तपासणी, चाचणी आणि उपचारांमध्ये वाढ केली असून, वरळी-कोळीवाडा नियंत्रित क्षेत्रातून उत्साहवर्धक परिणाम मिळत असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहकार्याने काम करत आहे. राष्ट्रीय मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे गुरुवारी (दि.23) संध्याकाळी 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईतील कोविड प्रकरणांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रवक्ते लव अग्रवाल यांनी सांगितले की, जलद प्रतिसाद पथकाबरोबरच अन्य दोन केंद्रीय पथके सध्या महाराष्ट्र सरकारबरोबर काम करत आहेत.

सर्वोत्तम परिस्थिती, सरासरी आणि सर्वात वाईट परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारच्या सहकार्याने सज्जते संदर्भात आखणी केली जात आहे असे ते म्हणाले. केंद्राने यापूर्वीच राज्य सरकारला दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या परिसरात संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढवायला आणि झोपडपट्टी भागात कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या कामाला गती द्यायला सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.