Mumbai : ‘छोटे मिया’ फेम अभिनेता मोहित बघेलचे कर्करोगाने निधन

एमपीसीन्यूज : ‘छोटे मियाँ’ या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेलचे आज (शनिवार) निधन झाले. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याचे कर्करोगाने नोए़डा येथील रुग्णालयात निधन झाले.

सलमानखानच्या ‘रेडी’ या चित्रपटात मोहित याने ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन मोहितच्या निधनाची बातमी दिली.

‘मोहित, माझ्या भावा जायची एवढी घाई का केलीस? मी तुला सांगितले होते की, पूर्ण इंडस्ट्री तुझ्यासाठी थांबली आहे, तू लवकरात लवकर बरे होऊन परत ये. नंतरच काम सुरु करु, असे मी तुला सांगितले होते.

तू खूप चांगला अभिनय करतोस म्हणून मी पुढच्या चित्रपटाच्या सेटवर तुझी प्रतीक्षा करेन… आणि तुला यावंच लागेल’, अशा शब्दांत राज यांनी मोहितला श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्री परिणीती चोप्रानेही राज यांचे ट्विट रिट्विट करत मोहितला श्रद्धांजली वाहिली. परिणीती आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘जबरिया जोडी’ या चित्रपटात मोहितने काम केले होते.

उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात मोहितचा जन्म झाला होता. तो लहानपणापासूनच कर्करोगग्रस्त होता. अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला. त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु, कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.